कात्रज/पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – आंबेगाव बुद्रुक येथे स्टेट बॅंकेजवळील महेंद्रसिंग मनोहरसिंग यांच्या गोदामावर बुधवारी (दि.10) धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेसळयुक्त 88 किलो तूप आणि वनस्पती तूप जप्त केले होते. मनोहरिंसंग याच्याकडून एकूण 33 हजार 96 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला होता. हे तूप प्रयोगशाळेत तपासणीसाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्याच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
पुणे कार्यालयास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी विक्रेत्या विरुद्ध तपासणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने तडजोड अर्ज दाखल करून 10 हजार रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. सदर प्रकरणी विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानदा कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई संजय नारगुडे, सह आयुक्त (अन्न) पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली रमाकांत कुलकर्णी, सहायक आयुक्त (अन्न) बारवकर यांनी केली.
उपनगरांत कारवाई तीव्र करणार…
भेसळ तूप प्रकरणी आंबेगाव बुद्रुक परिसरात अन्य ठिकाणीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच, उपनगरांतील अन्य भागातही अन्न औषध प्रशासनाकडून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत पथकांकडून माहिती घेतली जात असून कारवाई आणखी तिव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.