प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 11 – महापालिकेत 448 पदांसाठी मेगा नोकर भरती होणार आहे. यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी 87 हजार 471 अर्ज प्राप्त झाले आहेत. शेवटच्या तीन दिवसांत तब्बल 52 हजार अर्ज आले आहेत.
महापालिकेत गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ पदभरती झालेली नाही. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ‘वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक केली गेली आहे. पुणे, ठाणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर या शहरात मिळून साठ ठिकाणी परीक्षा केंद्र असतील. सुमारे पाच लाख अर्ज येतील अशी अपेक्षा महापालिका प्रशासनाला होती.