पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या केवळ 3 हजार 940 विद्यार्थ्यांनी संबंधीत कनिष्ठ महाविद्यालयात पहिल्या दिवशी प्रवेश निश्चित केला.
या विभागात 304 कनिष्ठ महाविद्यालयांत 1 लाख 8 हजार 104 प्रवेशाच्या जागा दर्शवल्या आहेत. पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी 84 हजार 105 जागा उपलब्ध करून झाल्या. त्यासाठी 68 हजार 72 अर्ज आले होते. त्यातील 40 हजार 13 विद्यार्थ्यांना रविवारी प्रवेश जाहीर झाला. त्यांना जाहीर झालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश नोंदविण्यासाठी 3 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.
गुणवत्ता यादीतील 13 हजार 185 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी तत्काळ समंती दर्शविली. 9 हजार 241 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. 4 विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले. 26 हजार 828 विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेशाबाबत काहीच माहिती कळवली नाही, अशी माहिती इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती सचिव मिना शेंडकर यांनी दिली.
गुणवत्ता यादीत नाव असले तरी प्रवेशासाठी सोयीचे नामांकित महाविद्यालय विद्यार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रत्यक्ष प्रवेश घेतले नसल्याची बाब उघड होत आहे.