पुणे- इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी (दि.4) जाहीर होणार आहे. प्रवेशासाठी कोणते कनिष्ठ महाविद्यालय मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्स्तुकता आहे.
अकरावीच्या पहिल्या प्रवेश फेरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 31 ऑगस्टपासून दुसऱ्या फेरीच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दितील 315 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यात 1 लाख 12 हजार 725 प्रवेश क्षमता दर्शवली आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी 83 हजार 802 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
यातील 75 हजार 917 विद्यार्थ्यांचे भरलेले अर्ज लॉक झाले आहेत. त्यातील 75 हजार 516 अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. 68 हजार 925 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविले.
30 हजार 815 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून 81 हजार 910 प्रवेशाच्या जागा रिक्त आहेत. दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीही विद्यार्थ्यांना अर्ज अपडेट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानंतर शुक्रवारी डेटा प्रोसेसिंगचे काम करण्यात आले.
शनिवारी या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यात कट ऑफही जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाचे “एसएमएस’ही पाठविण्यात येणार आहेत. प्रवेश निश्चित करण्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे.