पुढील आदेश येईपर्यंत राहणार बंद : चारही सीमा केल्या सील
भोर – शहरात करोनाचा कहर सुरूच आहे. शहरात बाधितांचा आकडा 122 वर पोहोचल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे बुधवार (दि. 2) पासून शहर पुढील आदेश येईपर्यंत “टाळेबंद’ (प्रतिबंधित क्षेत्र) ठेवा असा आदेश, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिले असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांनी सांगितले.
भोर शहरात यापूर्वी दि. 23 ते दि. 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांच्या मागणीनुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली होती. व्यापाऱ्यांना दुकाने उघडी ठेवण्यासाठी प्रशासनाने काही अटी व शर्थींवर सकाळी 9 ते 2 या वेळेतच परवानगी दिली होती. मात्र, व्यापाऱ्यांनी त्याचे पालन न करता सायंकाळपर्यंत दुकाने सुरू ठेवून मनमानी केली. परिणामी शहरात करोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. ही वाढती रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर शहरातील चारही सिमाही सील करण्यात आल्या असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.
शहरातील दुकाने तसेच बॅंकांमध्ये नागरीक मोठी गर्दी करत असून कोणीही सोशल डिस्टस्निंगचे पालन करत नसून अनेक जण तर विनामास्क बाजारात फिरत असल्याने करोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील एका राष्ट्रीयकृत बॅंकेचे तीन कर्मचारी तसेच एका ख्यातनाम हॉस्पिटलचे संचालक, डॉक्टरच करोनाच्या विळख्यात आडकले असून त्यांचे कुटुंबच विलगीकरणात गेले असल्याने भोर प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.