पुणे –देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून प्रवास करणाऱ्या वाहनांकडून 9 जानेवारीपासून वाहन प्रवेश शुल्क घेण्यास मनाई केली आहे. मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तांत्रिक कारण देत ही शुल्क वसूली अद्यापही सुरू आहे. पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटनेच्या वतीने सोमवारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना शुल्क वसुली बंद करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक संचालक दमण सिंग यांनी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक कार्यालयाला पत्र पाठवून कॅन्टोन्मेंट हद्दीतून वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार, खडकी व देहूरोड कॅन्टोन्मेंटने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद केली आहे.
संरक्षण मालमत्ता विभागाने पाठविलेल्या पत्रात व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश “शुल्का’ची आकारणी थांबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड वाहन प्रवेश “करा’ची आकारणी करते. त्यामुळे या पत्राच्या आधारे वाहन प्रवेश कराची आकारणी थांबविता येणार नाही. तसेच स्पष्ट निर्देश येत नाही तोपर्यंत वाहन प्रवेश कराची आकारणी सुरूच राहील.
– अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड
देशात “वन नेशन, वन टॅक्स’ ही प्रणाली लागू असताना तसेच नवीन वाहन खरेदी करताना “वन टाईम टॅक्स’ वाहनचालक भरतात. मात्र, छावणी हद्दीत प्रवेश करताना पुन्हा हा टॅक्स कशासाठी. हे चूकीचे आहे.
– संजय कवडे,संस्थापक, पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटना