पुणे : हल्लीच्या काळात काही पोटची मुलेच आईला त्रास देत असल्याच्या घटना घडतात. मात्र याच्याविरुद्ध अशी गोष्ट पुण्यात घडली आहे. भोर तालुक्यातील नांद गावातील शिक्षक सुनील दत्तात्रय गोळे आणि मेकॅनिक संतोष दत्तात्रय गोळे या दोन भावांनी आईच्या स्मरणार्थ घरासमोरच आईचे स्मारक उभे केले आहे. सध्या त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सुनील आणि संतोष यांच्या आई राहीबाई गोळे यांचे वर्षापूर्वी कोरोनामुळे बाणेर येथे निधन झाले होते. मात्र आईविषयी असणारे प्रेम, श्रद्धा, भावना व्यक्त करताना गोळे कुटुंबाने घरासमोरच आईच्या मूर्तीची स्थापना करून मंदिर उभारले. फायबरपासून बनवलेला आईचा हुबेहूब पुतळा घराच्या अंगणात स्थापन केला. त्यांचे या निर्णयाने संपूर्ण समाजासमोर एक आदर्श निर्माण करून दिला आहे.
राहीबाई यांनी शेती आणि सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या पती दत्तात्रय गोळे यांच्यासोबत 45 वर्षे सुखात संसार केला. दोन मुले आणि दोन मुलींना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले. मात्र आईच्या निधनानंतर घर पोरके झाले होते. आई गेल्याचे दुःख सहन होत नव्हते आणि आईची आठवण सतत येत होती. त्यामुळे राहीबाई यांचे पती दत्तात्रय गोळे, सुनील, संतोष (मुले), निलीमा खंडाळे, प्रमिला पाडळे (मुली) आणि संतोष पाडळे (जावई) यांनी एकत्र विचार केला. त्यानंतर राहीबाई यांचे स्मारक बांधण्याचे ठरवले आणि 8 एप्रिल रोजी पुतळा अनावरण केले.
दरम्यान, आजच्या जगात काही मुले ही आई- वडिलांनाच मारहाण करतात, त्यांना घरातून बाहेर हकलून देतात, त्यांचा तिरस्कार करतात. मात्र अशा मुलांना या दोन भावंडांनी एक आदर्श निर्माण करून दिला आहे.