नामदेव समाजोन्नती परिषद समितीचा निर्णय
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार
पुणे – पंढरपूरातील चंद्रभागेच्या तीरावर संत नामदेव महाराजांचे स्मारक बांधण्याचा निर्णय गुरुवारी “नामदेव समाजोन्नती परिषद समिती’तर्फे बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला ऍड. जी. व्ही. लाळगे, शिवनाथ मुळे, अनिल निकते, दिगंबर क्षीरसागर, संजय वैद्य, वसंतराव खुर्द, सुहास पतंगे, राहुल सुपेकर, मनोज बारटक्के उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन परिषदेचे अध्यक्ष सुधीर पिसे, सचिव डॉ. अजय फुटाणे, पुणे विभाग उपाध्यक्ष संजय नेवासकर, सहसचिव बापूसो बोत्रे, शहराध्यक्ष संदीप लचके, सुभाष मुळे यांनी केले.
परिषदेच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर सरकारच्या दहा एकर जागेवर 60 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे अत्याधुनिक तंत्राचा वापर करून संत नामदेव महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या नियोजित स्मारकात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा यासाठी परिषदेने अभ्यासू आणि तज्ज्ञ मार्गदर्शकांची बैठक कसबा पेठेतील श्री संत नामदेव मंदिर येथे आयोजित केली होती.
सरकारकडे आराखडा सादर करणार
या स्मारकासाठी राज्य सरकारकडे आराखडा सादर करण्यात येणार आहे. हा आराखडा तीन टप्प्यांत तयार करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात 20 तर तिसऱ्या टप्प्यात 15 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्याचा निधी राज्य सरकारने पूर्वीच मंजूर केला आहे. उर्वरित निधी केंद्र, राज्य सरकार, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, वारकरी, फडकरी, सर्व जाती धर्मातील बांधव यांच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहे.