सातारा – कास धरण ते पॉवर हाऊस यादरम्यान अतिरिक्त गुरुत्वनलिका टाकण्याच्या 102 कोटी 56 लाख रुपयांच्या विकासकामाला केंद्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असून केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा नगरपालिकेच्या मालकीच्या कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. उंची वाढवल्यामुळे धरणामध्ये 502 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आता होणार आहे. साताऱ्याकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला आहे. त्यामुळेच त्या पाण्याचा प्रवाह समावेशित होईल अशा प्रमाणित व्यासाच्या पाइपलाइन बसवणे गरजेचे झाले आहे.
त्यामुळे कास धरणापासून आणखी एक पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला अमृत योजनेअंतर्गत सादर करण्यात आला होता. कास धरण ते पॉवर हाऊस या 27 किलोमीटरच्या अतिरिक्त पाइपलाइन योजनेला तसेच 16 एमएलडी क्षमतेचा फिल्टर प्लान्ट व पॉवर हाऊस येथे दहा लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी, 10 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प इत्यादी कामे या प्रकल्पामध्ये होणार आहेत.
या कामासाठी डीआय आणि एमएस पाइपलाइन वापरण्यात येणार असून साडेपाचशे एमएम व्यासाची पाइपलाइन आहे. आजही धरणातून पाइपलाइनमधून कोणताही खर्च न येता 9 एमएलडी शुद्ध पाणी सातारकरांना उपलब्ध होत आहे. नव्या पाइपलाइनद्वारे 44 एमएलडी स्वच्छ पाणी सातारकरांना लवकरच उपलब्ध होणार आहे. या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून 102 कोटी 55 लाख खर्च करण्यात येणार आहे. पैकी केंद्र शासन 34 कोटी रुपये तर राज्य शासन 53 कोटी रुपये देणार आहे.
तर सातारा नगरपालिकेची 15 कोटी रुपये लोकवर्गणी असणार आहे. अमृत योजनेच्या केंद्रीय शिखर समितीची मंजुरी या कामाला मिळाली असून लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर अतिरिक्त पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. या कामांसाठी केंद्रीय जलमंत्री हरदीपसिंह पुरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांचे सहकार्य लाभल्याचे उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमूद केले आहे.