मुंबई – गणपती मिरवणुकीत गोळीबार करणाऱ्याला सिद्धीविनायक मंदिराचे (Siddhivinayak mandir) अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Mla Sada Sarvankar) यांच्यावर टीका केली. हिंदू सणात विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचे लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, पण तसे न करता त्याला बक्षीस देण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. ठाकरे गटाच्या आदेश बांदेकरांचा कार्यकाल संपल्यानंतर त्या ठिकाणी आमदार सदा सरवणकरांची नियुक्ती करण्यात आली, असेही ते पुढे म्हणाले.
गेल्या गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये (Prabhadevi) शिवसेनेच्या दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यावेळी हवेत गोळीबार गेल्याप्रकरणी आमदार सदा सरवणकर अडचणीत सापडले होते. याप्रकरणी चौकशीअंती सदा सरवणकरांना क्लिन चीट देण्यात आली होती. आता त्यांची सिद्धीविनायकाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी (AdityaThackeray) सरकारच्या निर्णयावर जोरदार निशणा साधला.
शिवसेना शिंदे गटाचे (Shinde group) महत्त्वाचे शिलेदार समजले जाणाऱ्या आमदार सदा सरवणकरांची मुंबईतील सिद्धीविनायकच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेनेत अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
माहीम, दादरचा गड शिवसेनेकडे राखून ठेवण्याचे काम सरवणकरांनी केले आहे. त्यानंतर ठाकरेंच्या विश्वासूंपैकी एक असणारे आमदार सदा सरवणकर शिंदे गटात सामील झाले होते.