नवी दिल्ली – अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल क्रिकेट स्टेडियम (मोटेरा स्टेडियम)चे नाव बदलण्यात आले आहे. या स्टेडियमला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान म्हणून मोटेरा स्टेडियम ओळखले जाते. मात्र याच स्टेडिमयमध्ये अडाणी आणि रिलायन्स उद्योग समूहांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
स्टेडियमच्या नामांतरावरून काँग्रेसनेते हार्दिक पटेल यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली आहे. याआधी काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी अनेकदा नरेंद्र मोदी यांच्यावर अदानी आणि रिलायन्स उद्योगांवरून टीका केली आहे. संपूर्ण देश या दोन उद्योगपतींच्या हातात देण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचे आरोप राहुल यांनी अनेकदा केले आहेत. त्यात आता स्टेडियममध्ये अडाणी आणि रिलायन्सचे नाव असल्याने वाद होण्याची शक्यता आहे. मैदानातील एका बॉलिंग एंडला अदानी यांचं नाव देण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बॉलिंग एंडला रिलायन्स एंड असं नाव देण्यात आले आहे.
तत्पूर्वी अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करण्यात आलं आहे. हा सरदार पटेल यांचा अपमान नाही का ? सरदार पटेल यांच्या नावाने मतं मागणारं भाजप सरदार साहेबांचा अपमान करत आहे. गुजरातमधील जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही, असं ट्विट हार्दिक पटेल यांनी केलं.