Pakistan Vs New Zealand 2nd T20 : पाच सामन्याच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केला आहे. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला 21 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानसमोर विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य होते. मात्र पाकिस्तानचा संघ 19.3 षटकांत 173 धावांवरच मर्यादित राहिला. पाकिस्तानकडून बाबर आझम आणि फखर जमान यांनी अर्धशतके झळकावली, पण ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. या विजयानंतर यजमान न्यूझीलंड 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 46 धावांनी पराभव केला होता.
पाकिस्तानी गोलंदाजांनंतर फलंदाजांचा फ्लॉप शो…
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाने दुसऱ्याच षटकात सलामीवीरांच्या विकेट्स गमावल्या. सॅम अय्युबला फक्त एक धाव तर मोहम्मद रिझवानला फक्त 7 धावा करता आल्या. पहिले दोन विकेट लवकर बाद गमावल्यानंतर बाबर आझमने फखर जमानच्या साथीने डाव पुढे नेला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. 97 धावांत 3 विकेट गमावल्यानंतर पाकिस्तानला सावरता आले नाही. संघाने सातत्याने विकेट गमावल्या.
बाबर आझमने 43 चेंडूत 66 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार मारले. तर फखर जमानने 25 चेंडूत 50 धावा केल्या. या फलंदाजाने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र, याशिवाय पाकिस्तानच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे शाहीन आफ्रिदीचा संघ लक्ष्यापासून दूर राहिला. बाबर आणि फखर व्यतिरिक्त शाहीन आफ्रिदी 22 धावा करून बाद झाला, तर उसामा मीरला खातेही उघडता आले नाही. अहमद 4, आझम खान 2 आणि आमेर जमाल केवळ 9 धावा करून बाद झाला.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर अॅडम मिलने हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. अॅडम मिल्नेने 4 षटकांत 33 धावांत 4 खेळाडू बाद केले. याशिवाय बेन सियर्स, ईश सोधी आणि टीम साऊदी यांना प्रत्येकी 2 यश मिळाले.
Adam Milne’s impressive display with the ball helped New Zealand to a win in the second #NZvPAK T20I 🔥
📝: https://t.co/q9DcvZvacH pic.twitter.com/HlC2g2haC5
— ICC (@ICC) January 14, 2024
ऍलनची स्फोटक अर्धशतकी खेळी…
तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 8 गडी गमावून 194 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सलामीवीर फिन ऍलनने सर्वाधिक धावा केल्या. फिन ऍलनने 41 चेंडूत 74 धावांची खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 5 षटकार मारले. याशिवाय केन विल्यमसनने 26, डॅरिल मिशेलने 17 धावा केल्या. कोरोनाची लागण झाल्यामुळे पहिला सामना खेळू न शकलेल्या मिचेल सँटनरने दुसऱ्या टी-20मध्ये केवळ 13 चेंडूत 25 धावा केल्या. सँटनरने या डावात 3 चौकार आणि 2 षटकार मारले. त्याने केवळ 13 चेंडू खेळून संघाची धावसंख्या 190 धावांच्या पुढे नेली. अशाप्रकारे न्यूझीलंडची धावसंख्या 20 षटकांत 194 धावांपर्यंत पोहोचली.
#FIHOlympicQualifiers2024 : भारताची निराशाजनक सुरुवात; पहिल्याच सामन्यात अमेरिकेकडून पराभव…
पाकिस्तानकडून गोलंदाजीत हारिस रौफने सर्वाधिक 3 बळी घेतले. अब्बास आफ्रिदीला 2 यश मिळाले. याशिवाय आमेर जमाल आणि उसामा मीरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.