ज्येष्ठ अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी झारा खानला इंस्टाग्रामवर अनेक अश्लील संदेश पाठवले जात होते आणि तिला जीवे मारण्याची धमक्याही मिळत होती. याबाबत तिने 6 नोव्हेंबर रोजी एका जणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही धमकी देणारी मुलगी हैदराबादची असून ती एमबीएची विद्यार्थिनी आहे. याबाबत ओशिवारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दयानंद बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत मुलीने झारा खानला इंस्टाग्रामवर अश्लील संदेश पाठवले आणि तिला थेट जीवे मारण्याची धमकीही दिली. तिने इंस्टाग्रामवर बनावट प्रोफाइल तयार केले आहे.
याबद्दल आम्ही इंस्टाग्रामला माहिती दिल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली. पुढे आम्ही शुक्रवारी एक नोटीस बजाविली आहे. ही नोटीस घेवून गेलेल्या संबंधित अधिकाऱ्याला तिने उडवा-उडवीचे उत्तर दिली. तसेच ती पोलीस ठाण्यास हजर राहण्यासही तयार नव्हती. सध्या तिची एक मेडिकल ट्रीटमेंट करणे बाकी असून ती मानसिकदृष्ट्या विचलित असल्याचे दिसते, अशी माहिती पोलिसांनी दिली. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास झारा खान ही “औरंगजेब’ आणि “देसी कट्टे’ या चित्रपटात झळकलेली आहे. या चित्रपटातील तिच्या दमदार अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्सुकता निर्माण झालेली आहे.