पुणे – करोना पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने प्रथम सत्राच्या परीक्षा शुल्क वाढीस स्थगिती दिली आहे. विद्यार्थ्यांकडून गतवर्षीप्रमाणे परीक्षा शुल्क आकारावेत, अशा सूचना विद्यापीठाने महाविद्यालयांना दिल्या आहेत.
पुणे विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून शैक्षणिक शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, करोना पार्श्वभूमीवर या शुल्कवाढीवर स्थगिती आणली होती. मात्र, परीक्षा शुल्काबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता.
परीक्षा शुल्काबाबत विद्यापीठाने कोणतीच स्पष्टता दिली नसल्याने महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क जमा करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गेल्यावर्षी पेक्षा जास्त शुल्क घेतले जात असल्याचे विद्यार्थ्यांच्या तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षा शुल्कासंदर्भात स्पष्टीकरण करण्याची मागणी होत होती.
दरम्यान, करोना पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या आर्थिक अडचणी विचारात घेऊन विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक वर्ष 2020 मधील प्रथम सत्रामध्ये होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांमधील परीक्षांची परीक्षा शुल्क व अन्य शुल्क यात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. महाविद्यालयांनी मागील वर्षाप्रमाणेच शुल्क विद्यार्थ्यांकडून घ्यावेत, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले. त्यामुळे आता कोणत्याही महाविद्यालयांना परीक्षा शुल्काच्या नावाखाली कोणतेही शुल्क घेता येणार नाही.