सध्या केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्ली सीमा रेषावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, मग तो सर्वसामान्य माणूस असो की बॉलीवूड सेलेब्स. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेला आणि लोकांना मदत करणारा अभिनेता सोनू सूद यानेही शेतकऱ्याच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. यापूर्वीही त्याने अनेक वेळा शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठविला आहे. सोनू सूदने पोस्ट केले की, शेतकरी आहेत, तर आम्ही आहोत.
या ट्विटवर असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर अनेक ट्विटर यूझर्सने सोनू सूदचे कौतुक केले आहे. त्याच वेळी अनेकांनी त्याच्याकडून मदतीसाठी विचारणा केली आहे. यापूर्वीही सोनू सूदने शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी एक ट्विट केले होते.
त्याने लिहिले होते की, शेतकऱ्यांच्या दर्जा हा आई-वडीलांपेक्षाही कमी नाही. या वाक्याने सोनू सूदने सर्वांची मने जिंकली होती. दरम्यान, सोनू सूदसह बॉलीवूडमधील अनेक जणांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. देशी गर्ल अर्थात प्रियांका चोप्रानेदेखील आंदोलनाचे समर्थन केले आहे. याशिवाय पंजाब चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकारांनी शेतकरी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे.