मुंबई – अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही मोठे यश मिळवले आहे. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. अभिनयासह ती एक बिझनेस वूमन देखील आहे. तिने न्यूयॉर्कमध्ये तिचं स्वत:च एक रेस्टॉरंट सुरु केलं होतं. या रेस्टॉरंटची सर्वत्र चांगलीच चर्चा झाली होती. मात्र आता या रेस्टॉरंटबाबत एक वेगळीच बातमी समोर आली आहे. प्रियांकाने न्यूयॉर्कमधील तिच्या रेस्टॉरंटसोबतच नातं संपवले आहे.
प्रियांकाचे ‘सोना’ हे रेस्टॉरंट पार्टनरशीपमध्ये होतं. मनीष के गोयल यांच्यासोबत तिने रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र आता प्रियांकाने रेस्टॉरंटसोबत असलेली पार्टनरशीप संपवली आहे. मनीष यांनी एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, “रेस्टॉरंटच्या क्रिएटिव्हिटीमध्ये प्रियांकाची खूप मेहनत होती. तिने दिलेल्या पाठिंब्याचे आणि पार्टनरशिपचे आम्ही आभारी आहोत. प्रियांका आता आमची क्रिएटिव्ह पार्टनर नाही. पण ती सोना फॅमिलीचा एक भाग असेल.” तिचं हेअर कलर ब्रॅँड आणि एक प्रोडक्शन कंपनी देखील आहे. त्यासाठी आता ती अधिक वेळ देणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र अद्याप प्रियांकाने हा निर्णय का घेतला याचं कारण समजू शकलेले नाही.
दरम्यान, प्रियांका नुकतीच सिटाडेल या सीरिजमध्ये दिसली होती. त्यानंतर ती जोया अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार असे म्हटले जात होते. मात्र, आता प्रियांका या प्रोजेक्टचा भाग नाही अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. सध्या प्रियांका पती निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये उपस्थित असल्याचे अनेकदा दिसते. नुकताच तिचा कॉन्सर्टदरम्यान भावूक झाल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.