अभिनेत्री कल्कि कोचलीन आई होणार असल्याचे वृत्त झळकल्यानंतर सोशल मीडियावरुन तिच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. याचे कारण विवाहाविनाच ती आई बनणार आहे. समाज कितीही प्रगत झाला असं आपण म्हणत असलो तरी समाजात आजही पुरुषप्रधान प्रवृत्ती दडलेल्याच आहेत. त्यामुळे स्रीस्वातंत्र्याचे कितीही गोडवे गायले तरी तिला तिच्या इच्छेनं मातृत्त्व स्वीकारण्याचा अधिकार समाज देत नाही.
बरं कल्कीनं तिचा जोडीदार कोण आहे हे उघडपणानं जगासमोर मांडलेलं आहे; तथापि, त्या दोघांनाही इतक्यात लग्न करायचं नाहीये. त्यामुळेच ती आपल्या या मातृत्त्वाबाबत उत्साही आहे. अर्थात, सुरुवातीला तिला याबाबत समजलं तेव्हा ती काहीशी निराश झाली होती. कारण याबाबत तिनं विचारच केलेला नव्हता. पहिल्या दोन महिन्यांपर्यंत तिला आई होणार असल्याच्या कसल्याही फिलिंगही जाणवल्या नाहीत.
पण तिने पहिल्यांदा जेव्हा बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकले, अनुभवले तेव्हापासून कल्की अत्यंत आनंदी झाली आहे. आता तिला जानेवारी महिन्याचे वेध लागले आहेत. कारण डॉक्टरांनी तिला जानेवारी 2020 मधील तारीख दिली आहे. कल्की सांगते की, गाय हर्शबर्गही तिच्यासोबतीनं सर्व जबाबदारी पेलत आहे.
तोही वडील बनण्याचे धडे गिरवत आहे. अनेकदा माझा मूड चांगला नसतो, तेव्हा हर्शबर्ग तिची योग्य देखभाल घेतो. शांत राहून तिचं सारं काही करतो. तथापि, अजूनही आम्हाला दोघांना लग्न करावं असं वाटत नाही असं ती म्हणते.