मुंबई – मराठी अभिनेते सुबोध भावे यांची एक फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सोनं आणि चांदीची तुलना पेट्रोल डिझेलसोबत केली आहे.
सुबोध भावे यांची फेसबुक पोस्ट –
“सतत असं वाटायचं की या सोनं आणि चांदीचा माज कोणीतरी उतरवला पाहिजे, त्यांना त्यांच्या किंमतीमुळे आपण लैच भारी असं वाटायला लागलं होतं. दरवर्षी सण आला की त्यांचा रुबाब वाढायचा. पण आता नाही.. कारण आता पेट्रोल आणि डिझेल यांनी सोन्या, चांदीची मस्ती उतरवली. आता दागिने पण यांचेच करणार, बँकेत ठेव म्हणून पण हेच ठेवणार. स्वतःबरोबर अख्खा बाजारभाव वाढवण्याच यांचं कर्तृत्व अफाट आहे. हे दोन नवीन भारीतले दागिने आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद” अशी खोचक पोस्ट अभिनेते सुबोध भावे यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवरून केली आहे.
सुबोध भावे यांनी केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून संमीश्र प्रतिक्रिया येत आहे. ही त्यांची फेसबुक पोस्ट चाहत्यांना आवडली असून त्यांनी फेसबुकवर शेअरही केली आहे.