Actor Govinda joins Shiv Sena – अभिनेता गोविंदा आहुजा यांनी आज गुरुवारी (दि. 28) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भगवा झेंडा हातात देत गोविंदाचे पक्षात स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.
पुन्हा राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. 14 वर्षांनंतर पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात होत आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईचा विकास झाला आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे आभारही मानले.
महायुतीमध्ये भाजपने आपल्या 24 उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. तर अजित पवार यांनी देखील दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने अद्याप एकही अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. अभिनेता गोविंदा आहुजा यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आधी देखील अभिनेता गोविंदा आहुजा हे काँग्रेस पक्षाकडून खासदार राहिले आहेत.