पुणे – थायरोकेअर लॅबने करोना चाचणीचा अहवाल चुकीचा दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली आहे. थायरोकेअर लॅबला हवेली तालुक्यातील ग्रामीण भागात स्वॅब तपासणी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. चुकीचा अहवाल दिल्याप्रकरणी खासगी लॅबवर पहिल्यांदाच अशी कारवाई झाली आहे.
खानापूर (ता. हवेली) येथील एका कुटुंबातील व्यक्तींनी करोनाची तपासणी केली असता दोन व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका लहान मुलाचा पॉझिटिव्ह आला होता. या अहवालाच्या निष्कर्षावर संबंधित कुटुंबियांनी संशय व्यक्त केल्याने त्यांचे नमुने पुन्हा एनआयव्ही पुणे, या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले. तपासणीअंती सर्व कुटुंबियांचे निष्कर्ष अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी थायरोकेअर या लॅबच्या कामकाज व निष्कर्षाबाबत संशय व्यक्त केला आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 व केंद्र शासनाकडील सूचनांनुसार थायरोकेअर प्रयोगशाळेचे कामकाज करोना विषाणू तपासणीच्या अनुषंगाने संशयास्पद असल्याने हवेली तालुक्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रातील थायरोकेअर तपासणी प्रयोगशाळा करोना स्वॅब तपासणी करीता बंद करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.