चार एकर क्षेत्राचे परस्पर वाटप केल्याने कारवाई

अखेर जिल्हा पुनर्वसन अधिकारी सापडले अडचणीत

शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरूर) येथे सरकारकडून कुठलीच संपादन तब्बल प्रक्रिया न झालेल्या चार एकर क्षेत्राचे परस्पर वाटप करून जमिनीची तातडीने विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्याकडून प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे संपूर्ण अधिकार काढून घेतले आहे.

चासकमान प्रकल्पबाधितांसाठी 1998 मध्ये चासकमान प्रकल्प भूसंपादन प्रक्रियेत तक्रारदार डॉ. धनंजय खेडकर यांचे वादिन नामदेव खेडकर व चुलते सितरण खेडकर यांचे शिक्रापूर येथील गट नं. 1420 मधील क्षेत्र वगळण्यात आले होते, मात्र, तब्बल 21 वर्षांनी 19 जून 2019 रोजी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी याबाबतचे आदेश देऊन चासकमान प्रकल्पग्रस्त सीताबाई वाडेकर, लक्ष्मण वाडेकर, विष्णू वाडेकर व शिवराम वाडेकर यांच्या नावे वाटप केले.

विशेष म्हणजे मयतांच्या नावाने वाटप करता येत नसताना सीताबाई वाडेकर, लक्ष्मण वाडेकर व शिवराम वाडेकर या मयतांच्या नावाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांनी वाटप केले. शिवाय प्रकल्पग्रस्तांचे एकूण 97 गुंठे बुडीत असताना शिरूर भिमाशंकर रस्त्याचे संपादन क्षेत्र देखील या प्रकल्पासाठी बुडीत दाखवून जादा क्षेत्राचे वाटप केले. तर हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर या क्षेत्राचे वाटप होताच पुढील पाच दिवसांत म्हणजे 24 जून रोजी केवळ आदेश पत्रावर या संपूर्ण क्षेत्राचे खरेदीखत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दुय्यम निबंधकांकडे करण्यात आले.

दुय्यम निबंधकांनी देखील केवळ आदेशपत्रावरून खरेदीखत नोंदविले. या व्यवहारातही रेडीरेकनरनुसार 2 कोटी 58 लाखांच्या जमिनीचे केवळ 1 कोटी 48 लाख रुपये एवढे मूल्य दाखवून खरेदी व्यवहारपुरती करून यामध्ये सुद्धा साडेसहा लाखांची मुद्रांक शुल्कातही हेराफेरी केली. दरम्यान, खेडकर यांच्या ज्या तक्रार अर्जावर आयुक्‍तांनी माझ्याबाबत निर्णय दिला आहे. त्याबाबत उच्च न्यायालयातील दावा खेडकर यांनी मागे घेतला आहे. हा दावा मागे घेतल्याची प्रत आपल्यापर्यंत अद्यापपर्यंत पोहचलेली असे वाघमारे यांचे म्हणणे आहे.

खेडकर यांच्या तीन महिन्यांच्या लढाईला यश
शिक्रापूर येथील जमिनीच्या या संपूर्ण प्रकरणाबाबत डॉ. धनंजय खेडकर यांच्या दि. 15 जुलैच्या तक्रार अर्जानुसार विभागीय आयुक्‍त दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्याकडून यापुढे प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे संपूर्ण अधिकार नुकतेच काढून घेतले असून कारणे दाखवा नोटीस बजावली. तर तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक यांना देखील बेकायदा दस्त नोंदविला म्हणून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबाबत नोंदणी महानिरीक्षकांना कळविले आहे. यावेळी बोलताना तीन महिन्यांच्या लढाईला यश आले असल्याची प्रतिक्रिया डॉ. धनंजय खेडकर यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.