दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतःचा नाकर्तेपणा लपत नाही : वेदांतिकाराजे

पिकनिकसाठी आलेल्यांना जनताच घरचा रस्ता दाखवेल

सातारा  – सत्ता असेल तर मोठमोठ्या विकासकामांसाठी भरीव निधी मिळतो. विरोधात राहून हवी ती विकासकामे होणार नाहीत, म्हणूनच दोन्ही राजेंनी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या 15- 20 वर्षात शिवेंद्रराजेनी काय कामे केली हे जनतेला माहिती आहे. निवडणुकीनिमित्त पिकनिक म्हणून फिरणाऱ्यांना शिवेंद्रराजेंनी केलेली कामे कशी दिसतील? टीका करणं सोपं असत. दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतःचा नाकर्तेपणा लपत नाही, अशा शब्दात श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी विरोधकांना फटकारले.

भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे सातारा लोकसभा पोटनिवडणूकीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले आणि सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सोमवारी रात्री करंजे आणि सदरबझार येथे कोपरा सभा झाल्या.

याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, राजू भोसले, लता पवार, मनोज शेंडे, बाळू ढेकणे, शैलजा किर्दत, भाग्यवंत कुंभार, सुवर्णा पाटील, ड्येनी फरांदे, शंकर काका किर्दत, अतुल चव्हाण, डॅनी पवार, जगन्नाथ किर्दत, अमर इंदलकर, बबन पाटील, सदरबझार येथील सभेस स्नेहा नलावडे, निशांत पाटील, विजय काटवटे, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कदम, मिलिंद काकडे, यांच्यासह सर्व आजी, माजी नगरसेवक उपस्थित होते.

नुकतेच साताऱ्यातील हद्धवाढ, कॉंक्रीट रस्ते हे प्रश्‍न मार्गी लागले असून शिवसृष्टी, एमआयडीसीमध्ये नवीन मेगा प्रोजेक्‍ट, मेडिकल कॉलेज अशी लोकहिताची विकासकामे मार्गी लावण्यासाठी दोन्ही राजें भाजपमध्ये गेले आहेत. पावसाळ्यात उगवणाऱ्या भूछत्राप्रमाणे काही लोक निवडणूक आली कि उगवतात. हे सातारकरांना नवीन नाही.

डोळ्यावरच्या द्वेषपट्टीमुळे शिवेंद्रराजेंनी सातारा- जावली मतदारसंघात केलेली विकासकामे यांना कशी दिसतील? फक्त प्रेम, आपुलकी आणि प्रामाणिकपणे केलेलं कामं यामुळेच शिवेंद्रराजे यांचे आणि सातारा- जावलीतील जनतेचे घनिष्ट नाते निर्माण झाले आहे. हे विरोधकांच्या डोळ्यातनेहमीच खुपत असते. मतदारसंघाच्या विकासासाठीच शिवेंद्रराजे कायम बांधिल राहिले असून आगामी काळात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला जाणार आहे.

स्वार्थी विरोधकांना सातारा- जावलीचा झालेला कायापालट बघवत नाही. त्यामुळेच शिवेंद्रराजेनी काहीही केलं नाही, असा पाढा वाचला जात आहे. शिवेंद्रराजेनी काय केल, हे जनते समोर आहे. खोटेनाटे आरोप करून तुमची डाळ शिजणार नाही. 21 तारखेला मतदानाद्वारे जनताच खोटारड्या आणि नाटकी विरोधकांचा पिकनिक दौरा बंद पाडतील आणि त्यांना घरचा रस्ता दाखवतील, असा टोला लगावतानाच सातारा शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कमळासमोरील बटन दाबून दोन्ही राजेंना विजयी करा असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)