रोडरोमिओंच्या मोटरसायकली पोलीस ठाण्यात जमा
शिरूर – शहरातील सिटी बोरा कॉलेज रयत शाळा विद्याधाम शाळा या परिसरात टिंगल टवाळी करत फिरणाऱ्या 21 रोडरोमियोंवर शिरूर पोलिसांनी कडक कारवाई केली असून, यामुळे नागरिककडून शिरूर पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
9 जानेवारी रोजी दैनिक प्रभातमध्ये शिरूरमधील रोड रोमिओ यांचा उच्छाद व महिलांची केलेली छेडखानी याबाबत वृत्तांकन केले होते. याची दखल शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी भरवलेल्या जनता दरबारात घेण्यात आली होती.
याबाबत कडक कारवाई करावी, अशा सूचनाही आमदार अशोक पवार यांनी दिल्या होत्या. शिरूरमध्ये रोडरोमिओ यांच्या त्रासाला कंटाळून महिला, कॉलेज तरुणी असुरक्षित झाल्या होत्या. महिलेच्या अंगावर हात टाकणे, महिलाशी अश्लील वर्तन करणे, कॉलेज तरुणींना लाथ मारणे याबाबत उदाहरणासह दैनिक प्रभातच्या वतीने वार्तांकन करण्यात आले होती.
या वृत्ताची दखल शिरूरमधील नागरिकांनी घेऊन याबाबत आवाज उठवला होता. यावर शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यात येईल असे सांगितले होते. आणि दि. 10 व 11 जानेवारी रोजी शिरूर पोलीस स्टेशनच्या पथकाने शिरूर येथील कॉलेज शाळा परिसरात जास्त घालण्यास सुरुवात केली.
दोन दिवसांमध्ये रोड रोमिओंवर कारवाई करून 21 दुचाकी पोलीस ठाण्यात जमा केल्या. सोळा हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल केला तर कायदा क्रमांक 110 व 112 प्रमाणे खटलेही दाखल करण्यात आले आहेत.
कॉलेज परिसरात फिरणारे रोडरोमिओ यांच्यावर ही कारवाई एक किंवा दोन तीन दिवसांसाठी न करता कायमस्वरूपी असावी. या भागात खाजगी शिकवणी, शाळा, कॉलेज भरण्याअगोदर व सुटण्याच्या वेळेस या भागात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.