‘एफडीए’कडून कारवाईचा फार्स

गुटख्याची विक्री सुरुच : गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प

पिंपरी – गेल्या काही दिवसांपासून गुटखा, पानमसाला, सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरूद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) कडक कारवाई करण्यात येत असल्याचे दिसत आहे. परंतु ही कारवाई आहे की कारवाईचा फार्स असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. शहरात व उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अचानकच पान टपऱ्या बंद होताना दिसल्या. एफडीएकडून छापेमारी सुरु असल्याचे विक्रेते सांगतात, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा त्या टपऱ्या सुरु होतात आणि गुटख्याचीही सर्रास विक्री सुरु होते. यामुळे “एफडीए’ला अपयश आल्याचे दिसून येत आहे.

गुटखा बंदीसाठी कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले. सूत्रधारांना शोधून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. तथापि, अद्यापही छुपेपणाने गुटखा, विकला असल्याचे दिसत आहे.

शहरामध्ये परराज्यातून गुटखा दाखल होतो. विविध बाजारपेठांमध्ये या गुटख्याची साखळी पद्धतीने विक्री केली जाते. ठोक विक्रेत्यांकडून गुटखा पानटपरी, छोटे दुकानदार यांच्याकडे पोहचविण्यात येतो. ही साखळी तोडण्यात “एफडीए’ कमी पडत असल्याचे चित्र आहे. गेल्या दहा महिन्यांमध्ये 10 ठिकाणी एफडीएकडून कारवाई करण्यात आली. त्यामध्ये केवळ 26 लाख 35 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. कारवाई सुरु असल्याचे विक्रेते सांगत आहेत, परंतु आपल्या नेहमीच्या ग्राहकांना मात्र गुटखा देत आहेत आणि तोही अधिक दरात. एकंदरीतच कारवाईचा व्यावसायिक आणि विक्रेते दर वाढवून आर्थिक फायदाच करुन घेत असल्याचे दिसत आहे.

शहरात गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या होणाऱ्या विक्रीला आळा बसावा, यासाठी “एफडीए’कडून सलग कारवाई करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी कुदळवाडीत कारवाई केली. त्यानंतर, निगडी-प्राधिकरण आणि पिंपरी भागातही याबाबत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. गुटखा विक्रेत्यांची साखळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.
– संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here