कण्हेरीत मादी, वढू येथे बिबट्या जेरबंद

आणखी बिबटे असल्याची ग्रामस्थांना शंका

डोर्लेवाडी/भवानीनगर -बारामती तालुक्‍यातील काटेवाडी, कण्हेरी या गावात धुमाकूळ घालणारी मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. दरम्यान, 30 जानेवारी रोजी शेतकरी संतोष जाधव यांच्या उसाच्या शेतामध्ये नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता त्याच शेतात गुरुवारी (दि. 13) पहाटे या मादीला जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.

बारामतीचे वनपरिमंडल अधिकारी त्र्यंबक जराड म्हणाले की, या पकडलेल्या बिबट्यास भूगाव येथील रेस्क्‍यू सेंटर याठिकाणी नेण्यात आले असून हा बिबट्या जखमी झालेला आहे का नाही याची तपासणी करून यानंतर सुरक्षित ठिकाणी वन संरक्षण अधिकारी या बिबट्याची रवानगी करणार आहे.बारामती तालुक्‍यातील कण्हेरी, काटेवाडी, ढेकळवाडी, झारगडवाडी आणि पिंपळी लिमटेक या भागातील शेतकऱ्यांच्या पाळीव जनांवरांवर या नर आणि मादी बिबट्याने फस्त केले होते.

यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झालेला होता. तर अनेक शेतकती आणि शेतमजूर या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात देखील जाण्यास धजावत नव्हते. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वनविभागाने रात्रंदिवस कष्ट घेऊन या बिबट्यावर 6 ट्रॅप कॅमेरे लावून पाळत ठेवली होती. 30 जानेवारी रोजी नर जातीचा बिबट्या जेरबंद केल्यानंतर 13 दिवसानंतर गुरुवारी त्याच शेतामध्ये मादी जातीचा ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले असल्याचे जराड यांनी सांगितले.

दरम्यान, कण्हेरी आणि काटेवाडी परिसरात धुमाकुळ घालणारे दोन बिबटे जरेबंद झाले असल्याने थोडी भीती कमी झाली असली तरी आणखी बिबटे असल्याच्या शंकेमुळे अद्यापही बिबट्याची भीती कायम आहे.

ही बिबट्याची मादी पकडण्याअगोदर या भागांमध्ये ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेऱ्यामध्ये सध्यातरी बिबट्याच्या बछड्याचे कोणतेही चित्र चित्रित झालेले नाही. त्यामुळे या भागात बिबट्याची बछडे आहेत की नाहीत, याचा सध्यातरी सुगावा लागलेला नाही; परंतु गुरुवारी बिबट्याची मादी पकडल्यानंतर दोन ते चार दिवस या भागातील पिंजऱ्याला टाळे लावले आहे. या चार दिवसांत बिबट्याने या भागात हल्ला केला, असे समजले तर वन विभागाच्या वतीने पुन्हा या भागांमध्ये पिंजरा लावण्यात येणार आहे.
– त्र्यंबक जराड, वनपरिमंडल अधिकारी बारामती

 

Leave A Reply

Your email address will not be published.