पुणे- मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात अपघातांचे सत्र कायम असून नवले पुल परिसरात ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तर मंगळवारी नवले पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून दुचाकीवरुन निघालेल्या पुरुषाच्या अंगावरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळच्या सुमारास घडली.
पूजा निलेश कांबळे (30 , रा. वडगाव बुद्रुक) असे सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालक धमेंद्रकुमार सरोज (26 , रा. उत्तरप्रदेश) याला सिंहगड पोलिसांनी अटक केली. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पूजा मित्र विनोद कदम याच्या दुचाकीवरून दवाखान्यात निघाली होती. बाह्यवळण मार्गावरील नवले पुल परिसरात ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. सहप्रवासी पूजा चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकचालक सरोज याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ती एका मॉलमध्ये सेल्सगर्लचे काम करते, आजारी असल्याने तसेच घरी कोणीच नसल्याने तीचा मित्र तीला कात्रज येथील रुग्णालयात घेऊन गेला होता. रुग्णालयातून परतताना हा अपघात झाला.
तर मंगळवारी झालेल्या अपघातात विजय रंगनाथ कुलकर्णी यांचा मृत्यू झाला. ते वडगाव बुद्रुक येथील ऑरा सोसायटीमध्ये रहात होता. पुजेचे साहित्य घेऊन ते कात्रजच्या दिशेने चालले असताना बोअरवेल ट्रकने त्यांना धडक दिली. यात ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अण्णा वडेवाले हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्याने आरोपी आरोपी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.