लोणावळा – मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरुच आहे. आज पहाटे मुंबईच्या दिशेने येणारी 6 वाहने बोरघाटात एकमेकांना धडकली. या अपघातात सोलापूरच्या काँग्रेस नेत्यासह 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 8 जण जखमी आहेत. त्यापैकी तिघांची परिस्थिती गंभीर आहे. अपघातनंतर जखमींना तत्काळ नवी मुंबईतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोलापूर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव खरात (वय 36), सौरभ तुळसे (32), सिद्धार्थ राजगुरू (31, सर्व रा. सोलापूर) अशी मृतांची नावे असून अन्य एकाचे नाव समजू शकले नाही. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, बोरघाटात आडोशी बोगद्याच्या पुढे खोपोली एक्झिटजवळ ट्रकचा टायर फुटल्याने ट्रक द्रुतगती मार्गाच्या कडेला थांबला होता.
याचदरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहने अचानक थांबल्याने उतारावर एका ट्रकचालकाचे येथील वाहनावरील नियंत्रण सुटले. ट्रक पुढे जात असलेल्या स्विफ्ट कार आणि एका टेम्पोवर जोरात आदळला. यादरम्यान सहा वाहने ऐकमेकांवर आदळली.
या अपघातात दोन मोटारींचा चक्काचूर झाला. या विचित्र अपघातात चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या कारमधील तिघेजण गंभीर जखमी तर टेम्पो मधील चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.