Accident in Visakhapatnam : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम भीषण रस्ता अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. भरधाव वेगाने जाणारा रिक्षाआणि ट्रकची समोर समोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रिक्षामधून प्रवास करणारे आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले. विद्यार्थी रिक्षाने आपल्या शाळेत जात असताना वाटेत एका ट्रकला त्याची जोराची धडक बसली. ही घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.
एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, रस्ता अपघातात जखमी झालेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर ट्रकचालक आणि त्याच्या एका साथीदाराने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र तेथे उपस्थित असलेल्या रिक्षा चालकाने त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ट्रक भरधाव वेगात चौकाकडे जात असताना दुसऱ्या बाजूने येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिल्याचे दिसून येत आहे.
विशाखापट्टणमचे डीसीपी श्रीनिवास राव यांनीयाविषयी माहिती दिली. या अपघाताविषयी बोलताना, “चार विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अपघातात बळी पडलेल्या तीन मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. एक बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रकचालकाने मद्य प्राशन केले होते का, याचाही आम्ही तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले. चालक सध्या आमच्या ताब्यात आहे. रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुले बसल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
डीसीपी म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनीही वेळेवर शाळेत पोहोचण्याची काळजी घ्यावी. शेवटच्या क्षणी घाईघाईत शाळेत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हाच असे अपघात होतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांवर कडक कारवाई केली जाईल. पालकांनी मुलांना ऑटोने शाळेत पाठवण्यापूर्वी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे” असेही त्यांनी येवेळी म्हटले.