– विनोद मोहिते
इस्लामपूर – तीन मुलींच्या जन्मानंतर “तो” झाला. हसत खेळत आईवडिलांच्या अवतीभोवती दोन वर्षे बागडला. ” सार्थक ” चा खेळता खेळता ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला. शनिवारी सकाळी अकरा वाजता हा अपघात घडला. जन्मदात्यांच्या समोर एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी झालेला अंत पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून निघाले. सार्थक कविदास पवार असे दुर्दैवी बाळाचे नाव आहे.
इस्लामपूर ( जिल्हा – सांगली) येथील प्रकाश हॉस्पिटलच्या आवारात रस्त्याच्या कामासाठी पवार दाम्पत्य सकाळी नऊ वाजता आले होते. येथे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १० डी एल २७७७) हा साहित्य ने-आण करीत होता. सकाळी अकरा वाजता सार्थक खेळत असताना याच ट्रॅक्टर ट्रॉली खाली सापडला. अन् जागीच ठार झाला. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात केले प्रकरणी चालक मधुकर पवार याच्यावर इस्लामपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तुजारपूर रस्त्यावर असणाऱ्या लमाण तांडा येथील पवार कुटुंबीय रस्त्याची कामे करणे ,उकरणे,मुरूम, मातीचा भराव टाकण्याचे काम करीत असते.नेहमीप्रमाणे सकाळी लवकर स्वयंपाक बनवून डबा घेऊन पवार पती-पत्नी इतर सहकाऱ्यांच्या सोबत येथील प्रकाश हॉस्पिटलच्या परिसरात आले होते.
पोटाची खळगी भरायला सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथून इकडे आलेल्या पवार कुटुंबातील कविदास पवार हा दुसऱ्या पिढीतला. लहानपणापासून काबाड कष्ट करून जगणे हा नित्यक्रम ठरलेला. यातून मोठं होऊन कविदास याचा विवाह नात्यातील मुलीशी झाला. लग्नानंतर तीन मुली झाल्या. त्या नंतर मुलगा जन्माला आला. आतां जीवनाचे सार्थक झाले असे समजून मुलाचे नाव ” सार्थक ” ठेवले होते.दररोजच्या कामावर जाताना मुलगा सोबतच असायचा. मुलाकडे पाहून कष्ट करत मोठी स्वप्ने बाळगली होती.
दोन महिन्यांपासून प्रकाश हॉस्पिटलच्या कॅम्पस मध्ये सुरू असणाऱ्या कामावर आज पवार दाम्पत्य रोजगारासाठी गेले होते. गेली दीड-दोन महिने हाच दिनक्रम होता. सार्थक नेहमी प्रमाणे आजही आई-वडिलांच्या सोबत होता.आई-वडील माती टाकून रस्ता तयार करण्यात व्यस्त होते. दरम्यान बाजूला थांबलेला चालकाने ट्रॅक्टर पाठीमागे घेतला.
काही कळण्याच्या आत सार्थकच्या अंगावर ट्रॅक्टर गेला. त्यात तो चिरडला गेला. जन्मदात्यांच्या समोर एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत झाला. आईने केलेला आक्रोश ऐकून उपस्थितांना अश्रू अनावर झाले.दररोजच्या कामावर अवतीभवती असणारा चिमुकला मुलगा आतां आपल्यासोबत नसेल या भावनेने पवार दाम्पत्य पुरते भेदरलेल्या अवस्थेत होते.
सार्थक गेला..अन् स्वप्नांचा चुराडा झाला…
आतड्यांना पीळ बसला तरी श्रमाची कामे करत मुलासाठी पाहिलेली स्वप्ने काही क्षणातच बेचिराख झाली. आजचा शनिवार पवार कुटूंबासाठी काळा दिवस ठरला. चांगल्या आरोग्यासाठी हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी राबणाऱ्या हाताला स्वतःच्याच बाळाला मुकावे लागले.
तुजारपूर रस्त्यावर असणाऱ्या वस्तीवर दिवसभर भेदरलेल्या अवस्थेत मृत सार्थकची आई,आजी-आजोबा आणि तिन्ही मुली बसून होत्या. सायंकाळी शवविच्छेदन करून चिमुकल्या सार्थकचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.