वाठार स्टेशन – कोरेगाव तालुक्यातील एका गावात अल्पवयीन भावानेच स्वतःच्या लहान बहिणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे शिक्षण सातवीपर्यंत झाले असून ती गेल्या काही वर्षात शाळा सोडून घरीच राहत होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने घरातील आई- वडील मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर घराबाहेर असायचे. पीडितेचा भाऊ राहयला मामाकडे परगावी होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन पिडितेचा भाऊ एके दिवशी दुपारीच घरी आला.
त्या अल्पवयीन संशयिताने पीडित मुलीला दमदाटी करून जबरदस्तीने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले. घरातील कोणास या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यानच्या काळात अनेक वेळा घरात कोणी नसल्याचा अंदाज घेऊन गेल्या आठ महिन्यांपासून तो पीडित मुलीवर अत्याचार करत राहिला. पीडित अल्पवयीन मुलीने माराच्या भीतीने या गोष्टीची वाच्यता कुठेच केली नाही.
मात्र, काल दि. 5 रोजी तिच्या हातापायाला सूज आल्याने तिच्या आईने तिला शासकीय रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर पीडित मुलगी गरोदर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्याने मुलीच्या आईला व पोलिसांना कळवली. त्यावेळी खोदून विचारल्यानंतर पीडित मुलीने घटनाक्रम आईला व पोलिसांना सांगितला. घटनेची फिर्याद पिडीतीने वाठार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी अल्पवयीन भावास ताब्यात घेतले. आज पोलिसांनी या संशयितास सातारा येथे बाल न्यायमंडळ या ठिकाणी हजर केले असता त्याला मंडळाने अभिरक्षा सुनावली. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तपास करीत आहेत.