अबाऊट टर्न : सहनशील

हिमांशू

“”राजास जी महाली। सौख्ये कधी मिळाली। ती सर्व प्राप्त झाली। या झोपडीत माझ्या।।” हे संत तुकडोजी महाराजांचे शब्द सर्वांना ठाऊक आहेतच. गरिबाच्या झोपडीत मिळणारे सुख पाहून प्रत्यक्ष देवांचा राजा इंद्रसुद्धा लाजतो आणि गरिबाच्या झोपडीत सदा शांतीचा वास असतो, असं तुकडोजी महाराज या रचनेच्या अखेरीस म्हणतात.

यातून सुख आणि समाधान या दोहोंमधला फरक स्पष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं मानलं जातं; परंतु केवळ आजच्याप्रमाणं त्याही काळी चर्चा फक्‍त गरीब आणि श्रीमंत यांचीच व्हायची, असंही या रचनेतून स्पष्ट होतं. श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये एक मध्यमवर्गही असतो याचा विसर आधुनिक काळात तर सर्वांनाच पडलाय. लोकशाहीत “अतोनात सहनशक्‍ती असलेला दुर्मिळ प्राणी’ अशीच मध्यमवर्गीयाची व्याख्या जणूकाही मान्य केली गेलीय.

हा वर्ग आपापल्या राजकीय नेत्यासाठी आणि पक्षासाठी प्रसंगी बाह्या सरसावून भांडायलाही मागे-पुढे पाहात नाही. निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावरच्या रांगेची लांबी कधीच पाहात नाही. त्याला दिसत असतं आपलं पवित्र वगैरे कर्तव्य. एकदा निवडणुका झाल्या, की त्यानं कसलीही अपेक्षा करायची नसते. अर्थात, निवडणुकीपूर्वी तरी मध्यमवर्गीयाला विचारतो कोण?

जाहीरनाम्यांमधल्या घोषणा आणि आश्‍वासनं एकतर कॉर्पोरेट क्षेत्रासाठी असतात किंवा आत्यंतिक गरीब वर्गासाठी. आजमितीस तर “मध्यमवर्ग अजून आहे,’ याची आठवण करून देण्याची वेळ आलीय.

करोनाच्या काळात याच वर्गाने सर्वाधिक खस्ता खाल्ल्यात. गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि कामगारांना बरंच काही भोगावं लागलं हे मान्य आहेच; परंतु कुणी ना कुणी पुढे येऊन किमान अन्नपाकिटं, शिध्याची किट असं काही ना काही गरिबांसाठी देत होतं. त्याचा सर्वच गरिबांना लाभ झाला असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल; पण किमान काहींना तरी मदत नक्‍कीच मिळाली. शिवाय, मोफत रेशन आणि अन्य योजनांचेही लाभ या वर्गाला मिळाले.

ध्यमवर्गातल्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांच्या पगारात कपात झाली. नोकरी जाण्याच्या भीतीनं मिळेल तेवढ्या वेतनावर मध्यमवर्ग काम करत राहिला आणि दुसरीकडे त्याच्या खिशाला परवडेल, असं काहीही मिळेनासं झालं. कामाचं ठिकाण लांब असेल तर दुचाकीत पेट्रोल भरायला पैसे नाहीत, अशी अनेकांची गत झाली. पेट्रोलनं शंभरी कधीच ओलांडलीय. आता दसरा-दिवाळीचा मुहूर्त साधून डीझेलनेही शंभरी गाठलीय. 

एकदा वाहतूकखर्च वाढला की, सगळ्याच वस्तूंची महागाई होते. गोरगरिबांना सरकारचा आणि दानशूरांचा मदतीचा हात मिळतो आणि श्रीमंतांचा तर महागाईशी दुरान्वये संबंध नसतो. यंदाही सणासुदीत मध्यमवर्गीयांचंच कंबरडं मोडणार, हे स्पष्ट झालंय. उदारीकरणाचा लाभ घेऊन मध्यमवर्गातून नवश्रीमंत वर्गात गेलेले लोकसुद्धा नेहमी मध्यमवर्गीयांनाच वाकुल्या दाखवण्यात धन्यता मानतात. मग मध्यमवर्गीयांच्या हातात उरतंच काय? फक्‍त मोबाइल आणि स्वस्त डेटा.

किंबहुना “झळ’ जाणवू नये यासाठीच डेटा तेवढा स्वस्त ठेवलाय. त्याचा वापर करून राजकीय नेत्यांविषयी, पक्षांविषयी शाब्दिक फटाके फोडण्यातच यंदाची दिवाळीही जाणार, हे स्पष्ट झालंय. अर्थात, डेटा स्वस्त असला, तरी ऑनलाइन क्‍लासच्या निमित्तानं पोरांच्याही हातात मोबाइल आलेत आणि आईवडिलांच्या खात्यातले पैसे परस्पर उधळायला ऑनलाइन गेम आणि “हुशारी’ उपलब्ध झालीय. त्यामुळे उरलीसुरली कसरही भरून निघेल!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.