– हिमांशू
‘बळीचा बकरा’ कशाला म्हणतात, हे किमान त्या बोकडाला तरी मरता-मरता समजलंच असेल, ज्याला आपण कशासाठी शहीद होत आहोत, हेच समजू शकलं नाही. गुन्हेगारी वाढली, यात बिचार्या बोकडाचा काय गुन्हा? आपला बळी देऊन गुन्हेगारी कमी होते ते त्याला ठाऊकच नव्हतं. मुळात गुन्हेगारांचीही ‘शांत’ करता येते हेच त्याच्या आकलनाबाहेरचं होतं आणि हाच त्याचा ‘गुन्हा’ ठरला. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी आणि अपघातांचं प्रमाण वाढलं होतं.
ते कमी व्हावं म्हणून पोलीस ठाण्यातल्या क्रमांक एकच्या अधिकार्याने क्रमांक तीनच्या अधिकार्याला हुकूम दिला, बोकडाचा बळी द्या! क्रमांक तीनच्या अधिकार्याने पोलीस ठाण्याच्या समोरच बोकडाला शहीद केले. मग बिर्याणी शिजली आणि सर्वांनी तो प्रसाद ग्रहण केला. आता यात पोलिसांचा तरी काय गुन्हा? परंतु आपल्या राज्यात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात असल्यामुळे आणि त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी याच पोलिसांवर असल्यामुळे प्रकरण चिघळले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकरणात उडी घेतली, माध्यमांनीही जोर लावला. बघता-बघता प्रकरण अंधश्रद्धेचे आहे, अशी ‘अङ्गवा’ सगळीकडे पसरली. वस्तुतः या घटनेचे कारण वेगळंच असल्याचं स्पष्टीकरण राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिले आणि बोकड आणखी कन्फ्यूज झाले. अर्थात, तेही कारण स्वीकारार्ह नाही आणि कारवाई होणारच, असंही गृहमंत्री म्हणाले आणि बोकडाला थोडा दिलासा मिळाला.
प्राप्त माहितीनुसार (सोर्स क्र. 2), संबंधित पोलीस ठाण्यातल्या एका अधिकार्याने नवी गाडी घेतली. (दुचाकी की चारचाकी, हे समजू शकलं नाही) या आनंदाप्रीत्यर्थ महाशयांनी पार्टी दिली आणि बोकडाच्या हौतात्म्याचं कथित कारण हेच आहे. या कारणाचा बोकडाने खूप सखोल विचार केला; पण कन्फ्यूजन कमी होईना. कारण संबंधित अधिकारी महाशयांना पोलीस खात्याने क्वार्टर (राहण्यासाठी) दिली असणारच. नसली दिली, तरी ते पोलीस ठाण्यात राहात नसणार. सबब, पार्टी नावाचा आनंदोत्सव ते राहत्या घरात करू शकले असते. तसेच पार्टीसाठी ढाबा, हॉटेलादी ठिकाणंही आसपास उपलब्ध असणारच. मग आपलं हौतात्म्य पोलीस ठाण्याच्या दारात (उपलब्ध ङ्गोटोनुसार) का झालं, हा प्रश्न बोकडाला पडणारच!
‘बोकड जातो जिवानिशी…’ या म्हणीचा उत्तरार्ध ‘…आणि खाणारे कारणावरून कन्फ्यूज करतात,’ असा असावा का? अंनिसचे कार्यकर्ते म्हणतात, जादूटोणा कायद्याची अंमलबजावणी कुणी, कशी, कुणाच्या मदतीने करायची, याचे प्रशिक्षण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांपासून अंगणवाडी ताईंपर्यंत सगळ्यांना दिलं जातं. पण दिव्याखालीच अंधार असेल तर कोण काय करणार? दुसरीकडे, घटनेचं वेगळंच कारण चर्चेत येतं. कन्फ्यूजन अटळ आहे!
अर्थात, कारवाई होणारच! पण मुद्दा असा, की कलम कोणतं लागणार? शिस्तभंगाचं की जादूटोणा कायद्याचं? कोणत्या कलमात किती शिक्षेची तरतूद? प्रकरण शिक्षेपर्यंत पोहोचणार की बदलीवर भागणार? असो, पहिलं कारण खरं असेल तर गुन्हेगारांचा आत्मविश्वास वाढेल. आपल्यापुढे यंत्रणा हतबल झाल्याचं पाहून त्यांना मूठभर मांस चढेल. चौकशी करणार्यांना शुभेच्छा देणं आपल्या हाती… कन्फ्यूजन दूर होण्याच्या प्रतीक्षेत बोकड आहेच!