हिमांशू
जेसीबी म्हणजेच बुलडोझर हे तसं आपल्याकडचं अत्यंत प्रसिद्ध मल्टीपर्पज यंत्र. हो, यंत्रच! कारण चाकं असूनसुद्धा त्याला वाहन म्हणता येत नाही, कारण ते प्रवासासाठी वापरत नाहीत. पायाखाली वस्त्याच्या वस्त्या तुडवण्याची शक्ती असली तरी त्याला हत्ती म्हणता येत नाही, कारण त्याला पाय नाहीत. पण ते अनेक गोष्टींचं “प्रतीक’मात्र आहे. एक तर हजारो हातांचं काम खाऊन टाकल्यानंतर बुलडोझर ऊर्फ “जेसीबी’ जन्माला आला आणि त्याच “जेसीबी’च्या नावाखाली भारतातल्या “निरुद्योगी’ लोकांच्या कथा जन्माला आल्या. “जेसीबी की खुदाई’ नावानं मध्यंतरी सोशल मीडियावर जो ट्रेन्ड चालला, त्याच्या मुळाशी हेच निरुद्योगीपण होतं. म्हणजे “भारतात जेसीबीच्या सहाय्यानं खोदकाम चाललेलं असलं तरी बघायला शेकडो माणसं जमतात,’ हा या ट्रेन्डचा पाया होता.
हाच बुलडोझर दिल्लीतल्या जहांगीरपुरी भागात आणि राजस्थानातल्या अलवर शहरात चालल्यामुळे नुकताच पुन्हा चर्चेत आला. दोन्हीकडे पाडकामाचे आदेश देणारे दोन वेगवेगळ्या पक्षांचे… त्यामुळे “इकडे बुलडोझर चालवला तर चालतो आणि तिकडे चालवला तर मिरच्या झोंबतात,’ वगैरे चर्चा करण्याची संधी अनेकांना मिळाली. महाराष्ट्रात बुलडोझर अलीकडे नेहमीच चर्चेत राहतो, याचं कारण निवडणुकीच्या निकालानंतर गुलालाची उधळण करण्याचं काम हल्ली याच यंत्राकडे आहे. मुठींनी गुलाल उधळून कुणाचं समाधानच होत नाही. जेसीबीमधून कार्यकर्त्यांना गुलालाची अंघोळ घालणं म्हणजे खरं सेलिब्रेशन..!
तर, असा हा बुलडोझर सांगली जिल्ह्यात अगदी वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलाय. मिरजमध्ये शांत रात्री बुलडोझरनं असा दणका दिला, की उभा महाराष्ट्र खडबडून जागा झाला. एखाद्या घरात हत्ती घुसावा तसा हा अक्राळविक्राळ राक्षस सरळ एटीएममध्ये घुसला. बुलडोझरच्या अजस्र पंजानं एटीएम मशीन फोडून टाकलेलं वरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं पाहिलं. एटीएमच्या बाहेर मात्र ना सीसीटीव्ही कॅमेरा होता ना सुरक्षारक्षक! बुलडोझर एटीएममध्ये घुसणं हा काही “अपघात’ नव्हता, तर ती चक्क चोरी होती. आजअखेर एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरट्यांनी अनेक प्रकारची औजारं आणि उपकरणं वापरली. पण चक्क बुलडोझरचा लोखंडी पंजा खाड्कन आत घुसेल आणि एटीएम फोडलं जाईल, हे खुद्द एटीएमच्याही मनात कधी आलं नसेल.
सुरुवातीला एटीएमलासुद्धा हा “अपघात’च वाटला असेल. चोरीचं असं दृश्य “स्वप्नदृश्य’ म्हणूनसुद्धा कुणी चित्रपटात चित्रित केलं नसेल. या घटनेत चोरट्यांनी 27 लाख रुपयांवर डल्ला मारला, अशी माहिती आहे. एटीएममधल्या सीसीटीव्हीचं फुटेज तपासलं तेव्हा रात्री साडेबाराच्या सुमारास एक माणूस एटीएममध्ये येऊन गेल्याचं दिसलं… त्यानंतर आत आला तो थेट बुलडोझरच! एटीएम फोडल्यावर बुलडोझरच्याच मदतीनं चोरट्यांनी त्याचे तीन तुकडे केले आणि रोकड लांबवली.
“समोरच्याला चकित करून टाकणे’ हा युद्धातला महत्त्वाचा डावपेच मानला जातो. हे तंत्र चोरीसाठी कुणी वापरेल, असं कधीच वाटलं नव्हतं. अहो, उद्या चोरटे एटीएममध्ये रणगाडा घुसवतील किंवा तोफगोळ्यानं एटीएम उडवतील आणि लोकांना वाटेल युद्धच सुरू झालंय. मिरजेतल्या घटनेत चोरट्यांनी वापरलेला बुलडोझरही चोरीचाच होता, असं म्हणतात. चोरांनी आधी पेट्रोल पंपावरून बुलडोझर चोरला आणि मग एटीएम फोडलं. बुलडोझरसुद्धा चोरीला जाऊ शकतो, ही आणखी एक धक्कादायक माहिती..!