अबाऊट टर्न : “बिघडलंय…’

हिमांशू

स्मार्ट फोनच्या रूपानं डिजिटल कॅमेरा जवळजवळ प्रत्येकाच्या खिशात असल्यामुळे आजकाल आपला भोवताल बदलत चाललाय. तो घडत चाललाय की बिघडत चाललाय, याविषयी भाष्य तूर्तास नको. परंतु घरातून बाहेर पडून इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंत आजकाल रस्त्यात शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे जसे भेटतात तसेच हे डिजिटल कॅमेरेही जणू काही लपून आणि टपून बसलेले असतात.

त्यामुळे गुप्त गोष्टी फारच कमी उरल्यात आणि भविष्यात त्या आणखी कमी उरतील, असं वाटू लागलंय. राजकारणातल्या मंडळींना तर “घडलंय-बिघडलंय’च्या पलीकडे जाऊन विचार आणि वर्तन करावं लागतं. शहाणे लोकप्रतिनिधी जिममध्ये व्यायाम करताना, सायकल चालवताना, जॉगिंग करताना, कुठेतरी चारचौघांत बसून भजी खाताना मुद्दाम व्हिडिओ तयार करवून घेतात आणि व्हायरल करतात.

काही लोकप्रतिनिधी तर यात इतके वाकब्‌गार झालेत, की पुढच्या निवडणुकीवेळी त्यांच्याकडे केवळ याच “कामां’च्या भल्यामोठ्या यादीची शिदोरी असेल. लोकप्रतिनिधींनी यापेक्षा अधिक काही काम वगैरे करणं अपेक्षित आहे, हे जनताजनार्दन पूर्णपणे विसरून जाईल तो सुदिन! अर्थात, लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करायला लावणाराही हा कॅमेराच असतो. तेलानं काठोकाठ भरलेलं भांडं हातात घेऊन त्रिभुवनाची फेरी मारताना नारदमुनींची जी अवस्था झाली असेल, ती लोकप्रतिनिधींची 24 तास असते. कधी कुठला व्हिडिओ किंवा रेकॉर्डेड फोन व्हायरल होऊन अडचणीत आणेल, सांगता येत नाही.

बिहारमधल्या एका आमदार महाशयांच्या नुकत्याच झालेल्या फजितीचं ताजं उदाहरण समोर आहे. संयुक्‍त जनता दलाचे हे आमदार पाटण्याहून दिल्लीला राजधानी एक्‍सप्रेसमधून निघाले. प्रवासात कोणता पोशाख घालावा, हा ज्याचा-त्याचा प्रश्‍न! हल्ली बहुतांश तरुण बर्मुडा वगैरे परिधान करूनच प्रवास करतात. पण आमदार महाशय केवळ अंडरविअर परिधान करून प्रवास करत होते. त्याच अवस्थेत ते डब्यातून फिरू लागले, तेव्हा मात्र काहीजणांचे स्मार्टफोन खिशातून बाहेर येण्यासाठी उड्या मारू लागले. आमदार महाशयांचे फोटो लगोलग व्हायरल झाले. तिथून पुढं बरंच रामायण झालं आणि अखेर स्पष्टीकरण देण्याची पाळी त्यांच्यावर आली. नेतेमंडळी त्यात एक्‍सपर्ट असतात.

आमदार महाशय म्हणाले, “”रेल्वेत बसल्याबरोबर माझं पोट बिघडलं. त्यामुळे “येरझारा’ घालण्याची वेळ आली. पण मी मुद्दाम केवळ अंतर्वस्त्रांमध्ये डब्यातून फिरतोय, असं लोकांना वाटलं. मी नेहमी खरंच बोलतो, त्यामुळे माझ्यावर विश्‍वास ठेवा.” विमानाऐवजी रेल्वेतून प्रवास केल्याबद्दल आमदार महाशयांचं सर्वप्रथम अभिनंदन करून मगच त्यांच्या बोलण्यातला तथ्यांश शोधला पाहिजे. शिवाय, पोट बिघडण्याचं कारण राजकीय नाही ना, हेही तपासलं पाहिजे. कारण एखाद्याचं भलं झालं की काहींच्या पोटात दुखू लागतंच आणि हा “आजार’ राजकीय मंडळींमध्ये अधिक आढळतो.

असो… आमदार साहेबांचं स्पष्टीकरण रेल्वेतल्या इतर प्रवाशांनी केलेल्या वर्णनाशी जुळणारं नाहीये. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, आमदार बनियन-अंडरविअरवर फिरत असताना डब्यातल्या काहीजणांनी आक्षेप घेतला, कारण डब्यात महिलाही होत्या. मग आमदार महाशय भलतेच चिडले आणि शिवीगाळ करू लागले.

एका प्रवाशाला तर त्यांनी गोळी घालण्याची धमकीही दिली म्हणे! दोनपैकी कोणती कहाणी खरी, कोण जाणे! पण अशा अवस्थेत फिरण्याइतकं पोट बिघडलेला माणूस धमकी देण्याच्या स्थितीत असतो का? तपासलं पाहिजे!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.