अबीर गुलाल उधळीत रंग…

चौथ्या दिवसाचाही “सवाई’ बहारदार :
गुलाबी थंडीतही पुणेकरांची भरभरून दाद
 
पुणे – मराठी आणि कन्नड अभंगांना रसिकांची मिळालेली दाद…मंत्रमुग्ध करणारे वादन…अप्रतिम नृत्यविष्कार आणि सुरेल सादरीकरण…अशा वातावरणात शनिवारी “सवाई’ बहारदार झाला. 67व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात ओंकारनाथ यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मुलतानीने गायनाची सुरुवात करत “गोकुलधाम…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. त्यानंतर “कंगन मुंदरिया मोरी…’ ही बंदिश सादर केली.

उत्तोरोत्तर रंगत जाणाऱ्या या मैफलीत खरे रंग त्यांच्या कन्नड, मराठी भाषेतील अभंगांनी भरले. त्यांनी मिश्र रागातील “रामा रामा…’ हे कन्नड भजन सादर केले. त्यानंतर “माझे माहेर पंढरी…’ या भजनाचे मराठी आणि कन्नड अशा दोन्ही भाषांत सादरीकरण करून रसिकांची भरभरून दाद मिळविली. यानंतर खास रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी कन्नड भजन सादर केले. त्यांना केदारनाथ हवालदार (तबला), समीर हवालदार (हार्मोनियम), समीर कुलकर्णी, जननी कुलकर्णी (तानपुरा), माऊली टाकळकर, राजेश कुलकर्णी (टाळ) यांनी साथसंगत केली.

यानंतर शाकिर खान (सतार) आणि तेजस उपाध्ये (व्हायोलिन) यांचे सहवादन रंगले. दोन्ही वाद्यांना पूरक अशा राग किरवणीने त्यांनी वादनाची सुरुवात केली. सतारीचा झंकार आणि व्हायोलिनचा सूर रसिकांना मंत्रमुग्ध करून गेला. त्यांना पं. विजय घाटे यांनी तबल्याची साथसंगत केली.

तर स्वामी कृपाकरानंद यांच्या बहारदार गायनाने रसिकांना खिळवून ठेवणारे ठरले. त्यांनी राग पटदीपने गायनाची सुरुवात केली. “शिव सूरज…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. त्यानंतर “तिलक ललाटे..’ ही बंदिश पेश केली.

स्वामी विवेकानंदरचित “डिमडिम डमरू बाजे…’ ही रचना सादर केली. तर सांगता करताना “अबीर गुलाल उधळीत रंग…’ हे मराठी भजन गात पुणेकरांची मने जिंकली. त्यांना महेश देसाई (तबला), अविनाश दिघे (हार्मोनियम), नामदेव शिंदे, दिगंबर जाधव (तानपुरा) यांनी साथसंगत केली. या गायकांना पुणेकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

वत्सलाबाई जोशी पुरस्काराने सन्मान…
पुणे: भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने दरवर्षी “वत्सलाबाई जोशी पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यावर्षी जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्‍विनी भिडे-देशपांडे यांना मंडळाच्या विश्‍वस्त शुभदा मूळगुंद यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरवण्यात आले.आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, आनंद भाटे, पंडित उपेंद्र भट, मिलिंद देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते. रोख रु. 51 हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. (छायाचित्रे ः हेमंत छत्रे)

ओडिसी नृत्याने जिंकली मने
महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात ओडिसी नृत्यांगना रीला होता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याला रसिकांची वाहवा मिळाली. “द वेदाज’ ही वेदावर आधारित मुख्य संकल्पना घेऊन त्यांनी नवदुर्गा, पल्लवी आणि गृहस्थाश्रम या संकल्पनांवर आधारित सादरीकरण केले. नवदुर्गा या नृत्याविष्कारात राग भैरवीद्वारा देवीचे नऊ वेगवेगळे प्रकार सुदर्शन साहू आणि प्राप्ती गुप्ता यांनी साकारले. त्यानंतर प्राप्ती गुप्ता आणि भव्या अरोरा यांनी राग रागेश्‍वरीमधील पल्लवी सादर केली. तर रीला होता यांची निर्मिती असलेले आणि त्यांची आई योग गुरू बिजोय लक्ष्मी होता यांची रचना असलेले अथर्व वेदातील विवाहित जीवन (गृहस्थाश्रम) अत्यंत लीलया आणि शृंगारिकरित्या साकारले.

“सवाई’सारखी जिवंत स्मारके उभी केली जावीत
जयपूर घराण्याच्या ख्यातनाम गायिका अश्‍विनी भिडे देशपांडे यांनी पं. भीमसेन जोशी यांनी “आपल्या गुरूंच्या स्मरणार्थ हा महोत्सव म्हणजे एक मोठे स्मारक आहे. अशीच जिवंत स्मारके उभी केली जावी. मी गुरूंचे कार्य असेच पुढे सुरू ठेवावे अशीच प्रेरणा मला या पुरस्कारातून मिळते,’ अशा भावना व्यक्‍त करत आपाली गायनसेवा सादर केली. त्यांनी राग खेम कल्याणमध्ये “बालमवा…’ या पारंपरिक रचनेने सुरुवात केली. त्यानंतर द्रुत तीन तालातील “पिहरवा मे कही दूर..’ ही बंदिश पेश केली. त्यानंतर राग नायकी कानडा मधील रूपक तालातील “मेरो पिया रसिया…’ व “निकसी अलबेली…’ या रचना पेश केल्या. त्यांनी पहाडी दादराने आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), विनोद लेले (तबला), धनश्री घैसास, स्वरांगी मराठे, ऋतुजा लाड (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

पुणे : “सवाई’च्या चौथ्या दिवसाचा समारोप डॉ. एल. सुब्रमण्यम यांच्या व्हायोलिन वादनाने झाला. त्यांनी राग कल्याणीमध्ये वर्णमने आपल्या वादनाची सुरुवात केली. त्यांना तन्मय बोस (तबला), फालगू व गानमूर्ती (पखवाज), राधाकृष्ण (घट्टम), यज्ञेश रायकर (तानपुरा), सत्यसाई (मोरसिंग) यांनी साथसंगत केली. याला रसिकांनी भरभरुन दाद दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.