झोपलेली कुंभकर्ण पालिका अन्‌ हतबल सातारकर!

सातारा – ऐतिहासिक सातारा शहर व परिसराची कधी नव्हती इतकी दुर्दशा आज झाली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता अशा प्राथमिक सुविधांपासून सुंदर शहराच्या घोषणेला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनापासून साऱ्यांनीच हरताळ फासला आहे. गेंड्याची कातडी असा शब्द वापरायचा तरी आता प्रश्‍न आहे. कारण या सर्व जबाबदारांची संवेदनशीलता त्यापलिकडे गेली आहे. त्यांना ना कुणाची फिकिर आहे ना कुणाची तमा.

आपल्याला हवे ते साध्य करून घेण्यापलिकडे काहीही न करण्याची या सर्वांची वृत्ती शहराला बकाल स्वरूप देत आहे. पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जाणारे शहर आता अतिक्रमणांचे आणि खोक्‍यांचे शहर म्हणून ओळखले जाईल. निधीची वासलात कशीही लावली तरी शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्याच नाहीत, शिवाय शहराचे विद्रुपीकरण अधिकाधिक करून आपलेच हितसंबंध जपण्याचे तंत्र विकसित करण्यात ठराविकजण पटाईत आहेत. सर्व प्रश्‍नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष आणि सोयीस्कर कामांसाठी वाटेल ते करण्याची भूमिका सर्वच जण घेत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्त्यांसाठी कोट्यवधी रूपयांचा निधी आणल्याच्या घोषणा प्रसिद्ध करणारी अनेक पत्रके गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झाली. तरीही शहर व परिसरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. सुस्थिती सोडा; अगणित खड्ड्यांनी सारे रस्ते व्यापले आहेत. वाहन चालविणाऱ्यांचे मणके जागेवर राहणार नाहीत, याची खात्री हे रस्ते देतात. काही काळ पावसाळ्याचे निमित्त असल्याने रस्त्यांची कामे सुरू करता येत नव्हती. लांबलेला पाऊस थांबला तरीही पालिकेचे सुस्त प्रशासन हललेले नाही. नव्याने चांगले रस्ते करण्याऐवजी पालिकेने पॅचिंग करण्याची तात्पुरती टूम काढली. काही रस्त्यांचे कामही सुरू केले. पण तेही धड केले नाही.

काही रस्त्यांचे पॅचिंग अर्धवट स्थितीत रखडलेले आहे. काही ठिकाणी रस्ता स्वच्छ करून खराब होण्याची वाट पाहिली जाते. नुसती खडी पसरून ठेवली जाते. शास्त्रशुद्ध असे काहीही न करता देखावा करून धूळफेकीचे काम व्यवस्थित सुरू आहे. रस्त्यांच्या या अर्धवट पॅचिंगमुळे बारीक खडी, मुरमाची माती होऊन धूळनिर्मिती करण्याचे कौशल्य पालिकेला प्राप्त झाले आहे. आसमंत भरून व्यापलेल्या या धुळीमुळे लोकांना खोकला, श्‍वसनाचे विकार वाढायला लागलेत. पाणीपुरवठ्याची स्थितीही समाधानकारक नाही.

शहराभोवती विपुल पाणीसाठा असूनही अनेकदा कृत्रिम पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. नागरिकांना पाण्यासाठी आंदोलन सुरू करावे लागते. काही भागाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुरवठा होतो. प्राधिकरणाच्या कारभाराचे धिंडवडे काढावे तेवढे थोडेच आहेत. पाणीगळतीपासून ग्राहकांना मिळणाऱ्या बिलापर्यंत अनेक मुद्‌द्‌यांनी प्राधिकरणाला घेरले आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना त्याची उत्तरे सापडत नाहीत. स्वच्छता अभियानाचे पुरस्कार पालिकेला मिळत आहेत, हे खरे असले तरी स्वच्छतेची स्थितीही लोकांसमोर आहे. सार्वजनिक ठिकाणी साठणारे कचऱ्याचे ढीग दिसतात. घंटागाड्यांचे नियोजन आणि अर्थकारण हा वेगळा विषय आहे.

प्राथमिक सुविधांची स्थिती अशी असताना इतर सुविधांबाबत विचार करणे म्हणजे खायचे वांदे असताना हौसमौज करण्यासारखे आहे. तरीही नवीन उद्यान प्रकल्प वगैरे आखणे दूरच. आहे त्या बागांकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे. केवळ देखभाल होत नसल्यामुळे या बागा उद्‌ध्वस्त होत आहेत. एकमेव असणाऱ्या नाट्यगृहाची स्थिती सुधारण्याचा देखावा सुरू आहे. रस्तोरस्ती आणि गल्लोगल्ली अतिक्रमणांची संख्या रोज वाढते आहे. इतर सर्व रस्त्यांवर अतिक्रमणांची गर्दी आहेच. पण मोकळ्या वाटणारा राधिका रस्ता हळूहळू खोक्‍यांनी गजबजू लागला आहे. मुख्य रस्त्यावरील फुटपाथवरचे अतिक्रमण वाढत असल्याने लोकांना रस्त्यामधून चालावे लागते, हे कुणालाच दिसत नाही. खोकी, ठिकठिकाणी लागणारे फ्लेक्‍स यामुळे सुंदरतेला कुरूपतेचा शाप लागतोय आणि शहर विद्रुप होत आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही.

चौकाचौकात फळकुटदादांची भरती वाढते आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये सातारा शहराची प्रतिमा वेगाने बदलत चालली आहे. लोकप्रतिनिधी व अधिकारी यांना या साऱ्या गोष्टी लक्षात येत नसतील तर नवलच. पण लक्षात येऊनही डोळ्यावर कातडी ओढली असेल तर सर्वसामान्य सातारकर जनता काय करणार. सातारकर हतबल आहेत. कोणी बोलत नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे माजी खासदार आणि आमदार यांसह नगराध्यक्षांसह पालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व विभागांचे अधिकारी व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यापासून सर्व अधिकारी सातारा शहरातून फिरतात. त्यांनाही ही सारी स्थिती दिसत असावी. त्यांनी डोळ्याला पट्टी बांधली तर सातारकरांनी दाद मागायची तरी कुणाला, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरातील ही स्थिती पाहता पालिका झोपलेली आहे. किमान ती झोप कुंभकर्णाची असावी. आता सहा महिने तरी जागे राहून काही कामांची पूर्तता करण्याची इच्छा दाखवावी.

ऐतिहासिक लौकिक वाढविण्याची वेळ आलीयं…
पालिकेतील सत्तारूढ आघाडीचे नेतृत्त्व माजी खासदार उदयनराजे भोसले करतात. नगर विकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. भाजपचे सहा नगरसेवक सभागृहात आहेत. दोन्ही नेते भाजपमध्ये गेल्याने पालिका तांत्रिकदृष्ट्या नसली तरी एका अर्थाने भाजपची झाली आहे. राज्यातील सत्तेत येण्याच्या अंदाजाने नेते भाजपमध्ये गेले तरी राज्यात भाजप सध्यातरी विरोधकाच्या भूमिकेत आहे. त्यामुळे सातारच्या आसमंतातच एक उदासीनता भरून आहे. सत्ता नसली तरी विकासाची आस जागी ठेवून कामे करण्याचे प्रयत्न दिसतच नाहीत.

त्यामुळे जे प्रश्‍न आपल्या हातात नाहीत, असे प्रश्‍न घेऊन लढण्याचा दांभिकपणा नेते करीत आहेत. टोलमुक्तीसाठीचे प्रयत्न हे त्याचेच उदाहरण आहे. त्याबाबतचा निर्णय हे नेते घेऊ शकत नाहीत. परंतु सातारा पालिकेची सत्ता हातात असताना इथल्या प्रश्‍नांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे ही नीती लोकांच्या लक्षात येऊ लागली आहे. साताऱ्याची ही स्थिती बदलण्याचे धोरण प्रामाणिकपणे स्वीकारले नाही तर ऐतिहासिक सातऱ्याचा लौकिक कायमचा पुसला जाण्याची भीती आहे. किमान हे लक्षात घेऊन तरी आता जागे व्हायला हवे. पालिकेचे प्रशासन नेत्यांना जुमानत नाही, ही स्थिती फारशी चांगली नाही. नेत्यांनी आपला वचक राखला पाहिजे. आणि स्वतःला नगरसेवक म्हणवणाऱ्यांनी आता स्वतःची तरी आब राखली पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.