चारशे गावठी बॉंम्बसह परप्रांतीय ताब्यात

उंब्रज – तारळे परिसरात डुकरे मारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 400 गावठी बॉंम्बसह संशयितरित्या फिरणाऱ्या अमर लुंगा आदिवासी मक्कड (वय 40 रा. कोड, ता. जि. कटनी, मध्यप्रदेश) या परप्रांतीयास उंब्रज पोलिसांनी तारळे भागातील कोंजवडे याठिकाणी शिताफीने पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलिसांना शुक्रवारी दि. 13 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन उंब्रज पोलिस, तारळे पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन टेहळणी करण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान तारळे ते कोंजवडे जाणाऱ्या रस्त्यावर एक परप्रांतीय व्यक्ती संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले.

पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या पिशवीत सापडलेले 400 गावठी बॉंम्ब, सात अँन्ड्रॉईड मोबाईल व 20 हजार 500 रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. याबाबत पोलिसांनी संशयिताची विचारणा केली असता जंगली डुकरे मारण्यासाठी याचा वापर करत असल्याचे त्याने सांगितले. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.