वाकड, (वार्ताहर) – रावेत येथील ग्रामदैवत धर्मराज उत्सवानिमित्त तीन दिवस आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता लक्षवेधी कुस्तीच्या आखाड्याने सोमवारी झाली. कुस्त्याच्या आखाड्याला नामवंत मल्लांनी हजेरी लावली. कै बाळासाहेब ज्ञानेश्वर भोंडवे आणि कै चंद्रकांत ज्ञानेश्वर भोंडवे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार्या रावेत केसरीचा विजेता अभिजित भोईर ठरला. किशोर सासवड आणि अभिजित भोईर यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अभिजित भोईर यांनी बाजी मारली.
अभिजित भोईर यांना चांदीची गदा देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आखाड्यात चमकदार निकाली कुस्त्या झाल्याने चांगलीच रंगत आली. आखाड्यातील कुस्त्यांना 501 ते 21 हजार रुपयांपर्यंत रोख इनामासह ग्रामस्थांकडून वैयक्तिक स्वरूपात रोख इनाम देण्यात आले. रावेत-मळेकर वस्ती रस्त्यालगत महापालिका शाळेजवळ लाल माती टाकून खास बनविलेल्या मैदानात झालेला कुस्त्यांचा आखाडा पाहण्यास पंचक्रोशीसह जिल्हा व शहरातील शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
कुस्ती आखाड्यातील अंतिम कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन प्रसाद सस्ते आणि अक्षय गरुड यांच्यात होऊन ती बरोबरीत सोडविण्यात आली. या वेळी पोलीस पाटील दिवाण भोंडवे, माजी सरपंच बाळासाहेब भोंडवे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक मधुकर भोंडवे, माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे उपस्थित होते.