नवी दिल्ली – आम आदमी पार्टीच्या राजकीय व्यवहार समितीने दिल्लीत होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख आणि पक्षाच्या ज्येष्ठ सदस्य स्वाती मालीवाल आणि विद्यमान राज्यसभा सदस्य संजय सिंह यांचे नामांकन जाहीर केले. १९ जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. तिसऱ्या जागेसाठी एन डी गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीतील तीन राज्यसभा खासदारांचा सहा वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असल्याने, नवीन सदस्यांच्या निवडीसाठी १९ जानेवारीला मतदान होणार आहे.संजय सिंग, सुशील कुमार गुप्ता आणि नारायण दास गुप्ता हे तीन सदस्य 27 जानेवारीला निवृत्त होणार आहेत.एनडी गुप्ता हे पक्षाचे कोषाध्यक्ष आहेत.
आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली, समितीने दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा नामनिर्देशनासाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला, तर सुशील कुमार गुप्ता यांनी हरियाणाच्या निवडणुकीच्या राजकारणाकडे आपले लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांना दिला आहे.
स्वाती मालीवाल या महिला हक्क कार्यकर्त्या आणि दिल्ली महिला आयोगाच्या सध्याच्या अध्यक्षा आहेत.यापुर्वी मालीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागार म्हणून काम केले आहे. त्या इंडियन अगेन्स्ट करप्शन चळवळीच्या प्रमुख सदस्य होत्या. दरम्यान, गुरुवारी दिल्ली न्यायालयाने आप पक्षाचे नेते संजय सिंग यांना तुरुंगातून पुन्हा नामांकनाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याची परवानगी दिली. संजय सिंह हे ४ ऑक्टोबर पासून कारागृहात आहेत.
भाजप, काँग्रेस आणि टीएमसीनंतर खासदारांच्या बाबतीत आप हा चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. 2024 मध्ये राज्यसभेतून 68 खासदार निवृत्त होणार आहेत. त्यात 9 केंद्रीय मंत्री आहेत. सर्वप्रथम दिल्लीत तीन जागा रिक्त होणार आहेत. येथे आप नेते संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा कार्यकाळ 27 जानेवारीला पूर्ण होणार आहे.