पारनेर – जीवन प्राधिकरणमार्फत राबविण्यात आलेल्या पाणी योजनेच्या लोकार्पणासाठी लावण्यात आलेली कोनशिला फोडून पोलीस कर्मचाऱ्यास जखमी केल्याप्रकरणी सन 2007मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी पारनेरचे आ. नीलेश लंके यांची नगर येथील सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी निर्दोष मुक्तता केली. दि. 18 ऑगस्ट 2007 रोजी पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दिलीप जमदाडे यांनी पारनेर ठाण्यात नीलेश ज्ञानदेव लंके, लाला साठे (दोघेही रा. हंगे), तसेच इतर वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असल्याने दि. 18 ऑगस्ट 2007मध्ये रोजी स्व. वसंतराव झावरे यांच्या पुढाकारातून ग्रामीण रुग्णालय व पाणी योजनेच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी आ. विजय औटी यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्याविरोधात तत्कालीन आ. औटी यांनी पारनेरला उपोषण सुरू केले होते.
एकीकडे औटी यांचे उपोषण सुरू असताना दुसरीकडे दुपारी 12च्या सुमारास नीलेश लंके, लाला साठे व इतर 20 जणांनी हंगा शिवारातील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीकडे कूच करून कोनशिलेवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. तेथे बंदोबस्तासाठी असलेले पो. कॉ. जमदाडे व पोना इधाटे यांनी असे करू नका, हे बेकायदेशीर आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने कोनशिला फोडून टाकली. दगडफेकीत जमदाडे जखमी झाले होते.
मनोमिलनानंतर निर्दोष मुक्तता
बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आ. नीलेश लंके व माजी आ. विजय औटी यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळत ही निवडणूक एकत्रित लढवून सर्व 18 जागा खिशात घातल्या. गुरू-शिष्याचे मनोमिलन झाल्यानंतर गुरूच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःवर गुन्हा दाखल झाला, तरी बेहत्तर या भावनेतून भूमिका घेणाऱ्या आ. नीलेश लंके यांची गुरू-शिष्याच्या मनोमिलनानंतर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली हा योगायोग आहे.
गुन्हा सिद्ध झाला नाही
न्यायाधीश एम. आर. नातू यांनी या गुन्ह्याच्या सुनावणीदरम्यान गुन्हा सिद्ध झाला नाही, साक्षीदारांच्या जबाबामधील तफावत लक्षात घेता पुरेशा पुराव्यांअभावी आ. नीलेश लंके व इतरांची निर्दोष मुक्तता केली. आ. लंके यांच्यातर्फे ऍड. सतीश गुगळे, ऍड. युवराज पाटील, ऍड. राहुल झावरे, ऍड. स्नेहा झावरे, ऍड. गणेश दरेकर, ऍड. शिवदास शिर्के यांनी काम पाहिले.