नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजेच एनआयएने दिल्लीतील एका इसिसच्या सदस्याला अटक केली असून हा इसम इसिस या इस्लामिक दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करीत होता अशी माहिती मिळाली आहे.
मोहसीन अहमद असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून तो मूळचा बिहारमधील पाटणाचा रहिवासी आहे, त्याला शनिवारी एनआयएने त्याच्या बाटला हाऊस निवासस्थानातून अटक केली. एनआयएने आरोपीच्या निवासी परिसरात झडती घेतली. त्यावेळी तो इसिस या संघटनेच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अहमद हा इसिस या कट्टरपंथीय संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. तो भारतातील तसेच परदेशातील सहानुभूतीदारांकडून संघटनेसाठी निधी गोळा करण्याचे काम करीत होता. तो हे पैसे सीरिया आणि इतर ठिकाणी पाठवत होता. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे एनआयएने सांगितले.
31 जुलै रोजी दहशतवादविरोधी एनआयएने मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरुच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, भटकळ आणि तुमकूर शहर या सहा राज्यांमधील 13 संशयित व्यक्तींच्या घरांची झडती घेतली होती. त्याच्या तपासात मोहसीन अहमदची माहिती मिळाली होती.