बर्मिंगॅहम – भारताची अव्वल महिला मुष्टियोद्धा नितू घांघस हीने महिलांच्या 45 ते 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्यासह पुरुषांच्या 48 ते 51 किलो वजनी गटात स्टार खेळाडू अमित पंघलनेही सुवर्णपदकाला गवसणी घातली.
नितूने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या डेमी जेडचा 5-0 असा पराभव केला. एकतर्फी झालेला हा सामना नितूने 5-0 असा सहज जिंकला. या अंतिम सामन्यात नीतूने उपांत्य फेरीत तसेच उपांत्यपूर्व फेरीत दाखवलेली आक्रमकता पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत 5 पैकी 4 फेरीनंतर नितूने 10 गुणांची कमाई केली.
दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही वर्चस्व राखत तिने जेडचा 5-0 असा पराभव केला आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील धनना गावच्या नितूने आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सर्वात मोठे यश देशाला मिळवून दिले.
अमितनेही धो डाला
भारताचा नावाजलेला खेळाडू अमित पंघलने पुरुषांच्या 48 ते 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने पदकाच्या लढतीत रविवारी इंग्लंडच्या किरन मॅकडोनाल्डचा 5-0 असा पराभव करत यश प्राप्त केले. 2018 सालच्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत त्याला रजतपदकावर समाधान मानावे लागले होते. यंदा मात्र, त्याने ही कसर भरून काढली.