पुणे – वानवडी परिसरातील एका डोंगरावर एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केला. यातील एका मुलाच्या शर्टावर रक्ताचे डाग असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून एकाचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली दिली. वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.
महादेव रघुनाथ मोरे (27,रा.काळेपडळ, मुळ. अहमदनर) खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो एका कंपनीत ऑफीस बॉयचे काम करतो. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील दोन मुले मोरे याला ओळखत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी (दि.1) रात्री ही घटना काळेपडळ संत शिरोमणी नरहरी महाराज मंदीराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार महादेव मोरे हा रात्रीच्या वेळी वानवडी परिसरातील एका डोंगरावर दारु पित बसला होता. तेव्हा ही मुले डोंगरावरील मंदिरातून देव दर्शन घेऊन परतत होती. त्यांच्याशी महादेवचा वाद झाला. या वादात मुलांनी महादेवला दगड मारले. एक दगड डोक्यावर लागल्याने तो रकतबंबाळ झाला. तो ही माहिती पोलिसांनी देईल या भितीने मुलांनी आणखी दगडे मारुन व मारहाण करत त्याचा खून केला.त्यानंतर ही सर्व मुले पसरा झाली होती.
दरम्यान हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कविराज पाटील हे रात्र कर्तव्यावर असताना, त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका मुलाच्या शर्टावर रक्ताचे डाग असून,तो तुकाईदर्शन येथे घऱात आहे. त्यानुसार पाटील यांनी त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मिळून महादेवचा याचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पाटील त्याला घटनास्थळी घेऊन गेले. तेथे महादेवचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. दगडाने डोके ठेचून त्याचा खून करण्यात आला होता.
वानवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार असल्यामुळे त्यांना ही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी धाव घटनास्थळी धाव घेत महादेवचा मृतदेह ताब्यात घेतला. तर सर्व मुलांना ताब्यात घेतले. या पाच मुलांपैकी एक मुलगा शाळेत जातो तर इतर मिळेल ती कामे करतात. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.