लोणंद – लोणंद ते निरा दरम्यान पालखी मार्गावरील पाडेगाव पाटीनजीक भवानी माता मंदिराजवळील उतारावर दुचाकी आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच म्रुत्यू झाला. दि. १६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ओव्हरटेकींग करण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक बसून हा अपघात झाला.
कोरेगाव येथील अविनाश लक्ष्मण बर्गे (वय २८) कोरेगाव येथून पुण्याला चालला होता. त्यावेळी ही दुर्घटना घडली. सदर या दुचाकीस्वार तरुणाचा साथीदार भोसले त्याच्याच पाठीमागून काही अंतरावर दुसऱ्या दुचाकीवर होता. अपघातानंतर तोच सर्वप्रथम अपघाताच्या ठिकाणी पोहचला. आपल्या मित्राचा अपघाती मृत्यू झाल्याचे पाहून त्याने मोठ्यानं हंबरडा फोडला. दोघेही कोरेगाव येथून दोन दुचाकीवरून पुण्याला जाण्यासाठी एकाच वेळेस निघालेले असताना पाडेगाव जवळ अविनाश बर्गे याच्यावर काळाने घाला घातला.
अपघातानंतर रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोणंद पलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरुणाचा म्रुतदेव शवविच्छेदनासाठी पाठवला. वाहतूक सुरळीत केली. रात्री उशिरा या अपघाताची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात करण्याचे काम चालू होते. सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार लोणंद पोलीस याप्रकरणी अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.