जॉन अब्राहम आणि दिशा पाटणी यांचे लीड रोल असलेल्या “एक व्हिलन रिटर्न्स’ चे शुटिंग अलिकडेच सुरू झाले. पण या सिनेमापुढे लगेचच एक संकट उभे ठाकले आहे. मुंबई पोलिसांनी या सिनेमाचे शुटिंग थांबवले आहे. प्रॉडक्शन टीमकडून शुटिंग दरम्यान करोनाचे नियम उघड उघड लाथाडले जात असल्याचे दिसल्याने पोलिसांनी हे शुटिंग थांबवले आहे.
शुटिंग मुंबईतील वरळीतील एका झोपडपट्टीतल्या काही भागात रात्रीच्यावेळी सुरू होते. काही सीनचे शुटिंग झाले आणि नंतर काही सीनचे शुटिंग होणार इतक्यात मुंबई पोलीस येऊन पोहोचले. त्यांनी पुढचे शुटिंग थांबवले. शुटिंग दरम्यान सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे कारण पोलिसांनी दिले. आता शुटिंग पुन्हा कधी सुरू होणार हे मात्र समजू शकलेले नाही.
कदाचित सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची ग्वाही दिली की शुटिंगची परवानगी मिळू शकेल. “एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये जॉन अब्राहम आणि दिशा पाटणी प्रथमच एकत्र काम करत आहेत. अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया देखील यातील महत्वाचे रोल करत आहेत. या शिवाय श्रद्धा कपूर, रितेश देशमुख आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे देखील एका विशेष रोलमध्ये दिसणार आहेत. “एक व्हिलन’ या 2014 मध्ये आलेल्या सिनेमाचा हा सिक्वेल असणार आहे.