थोडासा दिलासा ! राज्यात नव्या करोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक

9068 जण कोरोनातून मुक्त ; नवे 8744 करोनाबाधित रुग्ण

मुंबई : राज्यात आज नव्या कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात सलग तीन दिवस दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. आज ही संख्या 8744 एवढी आहे. तर आज 9068 जण कोरोनातून मुक्त झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.21% झालं आहे. दरम्यान मागील 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात आतापर्यंत 52 हजार 500 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 लाख 28 हजार 471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 20 लाख 77 हजार 112 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण 97 हजार 637 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या 4 लाख 41 हजार 702 जण होम क्वॉरन्टीन असून 4 हजार 098 जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टीन आहेत.

राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आता कोरोनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. तसेच 11 मार्च ते 4 एप्रिल या दरम्यान शहरातील सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी आणण्यात आली आहे. या दरम्यान लग्न समारंभावरही बंदी आणण्यात आली आहे.

नाशिकमध्येही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. शहरातील सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लास, आठवडी बाजार बंद राहतील. 15 मार्चनंतर लग्नसोहळे कार्यालय, सार्वजनिक ठिकाणी होणार नाहीत, खाद्यगृह, बार हे सकाळी 7 ते संध्याकाळी 9 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. जिम, व्यायामशाळेतील क्रीडा स्पर्धांना बंदी घालण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.