हजारो जणांचे सुरक्षिततेसाठी स्थलांतर
मनिला – फिलिपाइन्समध्ये ज्वालामुखीचा उद्रेक व्हायला लागल्यामुळे हजारो जणांना सुरक्षिततेसाठी स्थलांतर करावे लागले आहे. फिलिपाइन्सच्या अल्बाय या मध्य प्रांतातील माउंट मेयोन या ज्वालामुखीच्या मुखातून विषारी वायू आणि राख फेकली जाऊ लागली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला अपाय होण्याचा संभव असल्याने हे स्थलांतर केले जाते आहे.
या ज्वालामुखीमुळे फिलिपाइन्सला भूकंपाचा एक धक्का बसल्याचेही भूगर्भशास्त्रज्ञांनी म्हटले आहे. ज्वालामुखीमधून पेटलेले लाल दगडदेखील बाहेर फेकले जाऊ लागले आहेत. तसेच तप्त लाव्हा पर्वतमाथ्यावरून घरंगळत खाली येऊ लागला आहे. याबाबतच्या धोक्याची श्रेणी 2 वरून 3 वर नेण्यात आली होती. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही श्रेणी 5 या सर्वोच्च पातळीवर नेण्यात आली आहे.
आतापर्यंत 12 हजार जणांना सुरक्षित आश्रय छावण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे, असे फिलिपाइन्सच्या नागरी संरक्षण विभागाने म्हटले आहे. यातील बहुसंख्य ज्वालामुखीचा उद्रेक झालेल्या पर्वताच्या पायथ्याशी शेती करणारे शेतकरी आहेत.
माउंट मेयोन हा पर्वत फिलिपाइन्सची राजधानी मनिलाच्या आग्नेयेला 330 किलोमीटरवर आहे. फिलिपाइन्समध्ये एकूण 24 जिवंत ज्वालामुखी आहेत. त्यापैकी माउंट मेयोनचा ज्वालामुखी सर्वात धोकादायक मानला जातो.