पिंपरी – यशवंतराव चव्हाण पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर बुधवारी (दि. २४) दुपारी बारा ते दोन या वेळेत दोन तास ब्लॉक घेण्यात येणार असून पुणे लेन बंद राहणार आहे.
हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी 24.250 येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत बुधवारी (दि. २४) करण्यात येणार आहे. दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातून मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येणार आहेत.