पावणे तीन तास पायी चालत पोहचले जंगलात
मुंबई: मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुऱ्हाड चालवली आहे.
त्यानंतर पर्यावरण प्रेमींनी या प्रकाराला विरोध दर्शवत आरे बचाव आंदोलन सुरु केलं आहे. अरे परिसरात जमाव बंदी लागू केल्याने या परिसरात कुणालाही जाऊ दिले जात नव्हते. परंतु राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गनिमी कावा करत या जंगलात प्रवेश केला होता.
वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान आरेतील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली असून, पर्यावरणप्रेमींना यामुळे दिलासा मिळाला आहे. आंदोलन करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, त्यांची सुटका करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.