पुणे, {प्रभात वृत्तसेवा}– सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे यावर्षी दुर्मिळ ग्रंथाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. केंद्राच्या संदर्भ दालन कक्षात भरलेल्या या प्रदर्शानाचे उद्धाटन माजी सहायक ग्रंथपाल डॉ. लता गोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र उपस्थित होत्या. हे प्रदर्शन दि. १५ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात विद्यापीठाचा पहिला पदवी प्रदान सोहळा, पहिला वर्धापन दिन, विद्यापीठ वार्ताचा पहिला अंक, विद्यापीठाशी निगडीत पहिला वार्षिक अहवाल यांच्यासह पुणे विद्यापीठ कायदा १९४८ यासारखे निवडक ग्रंथ ठेवण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या भेटींचे दुर्मिळ छायाचित्रही ठेवण्यात आले आहे.
पं. जवाहरलाल नेहरू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, विजयलक्ष्मी पंडीत, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या छायाचित्रांचा समावेश आहे. तसेच १९५० साली जयकर ग्रंथालयाची स्थापन झाल्यावर येथे आलेले पहिले ग्रंथ, हस्तलिखित, नियतकालिक, शोधप्रबंध, मासिक प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या महापुरुषांची; तर ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे. वसंत कानेटकर, ना. धों. महानोरसारख्या प्रसिद्ध लेखकांच्या हस्ताक्षरातील पत्र, कविता, लेखही तुम्हाला या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.
तसेच केंद्राच्या पहिल्या पाच ग्रंथपालांचे छायाचित्रही या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संग्रहाची झलक इतिहासाची साक्ष देत आहे, त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जयकर ज्ञानस्त्रोत केंद्राच्या संचालिका डॉ. अपर्णा राजेंद्र यांनी केले आहे.